Agnipath Scheme : ‘अग्निपथ’बाबत कन्हैय्या कुमारच्या ट्विटवरून भडकले चित्रपट दिग्दर्शक, असा केला उद्धार

अग्निपथ योजनेवरून देशातील राजकारण चांगलंच गरम झालं आहे. काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी याबाबत केलेल्या एका ट्विटला चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Agnipath Scheme
‘अग्निपथ’बाबत कन्हैय्या कुमारच्या ट्विटवरून भडकले चित्रपट दिग्दर्शक  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • योजनेचे फायदे सांगणाऱ्यांनी आपल्या मुलांना सैन्यात घालावं
  • कन्हैय्या कुमार यांच्या ट्विटवरून भडका
  • दिग्दर्शक अशोक पंडित यांनी दिलं प्रत्युत्तर

Agnipath Scheme | अग्निपथ योजनेवरून सध्या देशभरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यावरून राजकारण जोरदार तापलं असून दोन्ही बाजूंनी या योजनेबाबत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्या ट्विटवरून सध्या काहीजणांचं पित्त चांगलंच खवळलं आहे. कन्हैया कुमार यांनी गेल्या काही दिवसांपासून अग्निपथ योजनेतील फोलपणाबाबतचा मुद्दा लावून धरला असून वेगवेगळ्या माध्यमातून ते या योजनेतील चुका आणि त्याचे भविष्यातील गंभीर परिणाम दाखवून देत आहेत. तर या योजनेच्या समर्थकांनी आता कन्हैया कुमार यांच्यावरच टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे. 

काय म्हणाले कन्हैय्या कुमार?

कन्हैय्या कुमार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट करत अग्निपथ योजनेवर टीका केली आहे. देशातील जे नेते आणि टीव्ही अँकर अग्निपथ योजनेचे फायदे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी सर्वप्रथम आपल्या मुलांना या योजनेनुसार सैन्यात दाखल करावं. प्रत्यक्षात मंत्री महोदयांचा लेक होणार बीसीसीआयचा सेक्रेटरी आणि देशातील तरुणांना चार वर्षांची भाडोत्री नोकरी दिली जाणार, असं कन्हैया कुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

अशोक पंडित भडकले

चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित या ट्विटवरून चांगलेच भडकल्याचं दिसतं. त्यांनी कन्हैय्या कुमारला रंग बदलणाऱ्या सरड्याची उपमा देत ट्विट केलं आहे. हा तोच सरड्याप्रमाणे रंग बदलणारा कन्हैया आहे, जो एकेकाळी भारतीय सैनिकांवर बलात्काराचा आणि लूटमार करण्याचा आरोप करत होता. आज तोच कन्हैया आपण सैनिकांच्या कुटुंबातून येत असल्याचा आरोप करत आहे, असं ट्विट करत पंडित यांनी कन्हैय्यावर टीका केली आहे. 

राजकारण तापलं

अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही, असं सरकारनं स्पष्ट करत भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. तर विरोधी पक्षांनी या योजनेवरून जोरदार टीका करणं सुरूच ठेवलं आहे. सैन्य भरतीची मूळ प्रक्रिया अतिशय सुरळीत आणि सैनिकांसाठी योग्य होती, मग ती बदलण्याचं कारणच काय, असा सवाल विरोधी पक्षांनी केला आहे. लोकसभेत चर्चा न करता, याबाबत तज्ज्ञांशी न बोलता, सैन्यातील तज्ज्ञांचा सल्ला न घेता सरकारच्या मनात आलं म्हणून वाटेल त्या पद्धतीनं सैन्य भरतीची प्रक्रिया का बदलली जात आहे, असा सवाल काँग्रेसनं केला आहे. तरुणांचा उद्रेक साहजिक असून डोक्यावरून पाणी वाहू लागल्यामुळेच तरुणांचा संयम संपत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

अधिक वाचा - Doctor murdered Partner: डॉक्टरने केली लिव्ह-इन पार्टनरची हत्या, व्हॉट्सअप चॅटवरून झालेल्या वादानंतर टोकाचा निर्णय

ही योजना मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केली आहे. तर योजनेतील तरतुदींमध्ये सरकारनं काही बदल केले आहेत. या बदलांसह योजना सुरूच राहिल, अशी घोषणा सरकारनं केली आहे. पुढील काही दिवस या योजनेवरून वाद सुरूच राहण्याची चिन्हं आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी