जाणून घ्या कोण आहेत नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या पुतळ्याचे मूर्तीकार

Find out who will carve Netaji Subhas Chandra Bose’s grand statue : सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाइटमधील मजबूत पुतळा उभारण्याचे काम नॅशनल मॉडर्न आर्ट गॅलरीचे (National Modern Art Gallery) महासंचालक अद्वैत गडनायक (Adwaita Gadanayak) यांच्याकडे देण्यात आले आहे.

Find out who will carve Netaji Subhas Chandra Bose’s grand statue
जाणून घ्या कोण आहेत नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या पुतळ्याचे मूर्तीकार 
थोडं पण कामाचं
  • जाणून घ्या कोण आहेत नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या पुतळ्याचे मूर्तीकार
  • नॅशनल मॉडर्न आर्ट गॅलरीचे महासंचालक अद्वैत गडनायक घडविणार बोसांचा पुतळा
  • भारताचे राष्ट्रपती भवन दिल्लीतल्या रायसीना टेकडीवर आहे, या टेकडीवरून पुतळा सहज बघता येईल

Find out who will carve Netaji Subhas Chandra Bose’s grand statue : नवी दिल्ली : भारताचे आघाडीचे स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाइटमधील भव्य पुतळा इंडिया गेट येथील चार खांबांच्या दगडी मंडपात (चबुतरा) उभारला जाईल. पुतळा उभारेपर्यंत दगडी मंडपात सुभाषचंद्र बोस यांचा पुतळ्यासारखा दिसणारा होलोग्राम दिसत राहील. हा होलोग्राम उद्यापासून म्हणजेच रविवार २३ जानेवारी २०२२ पासून दिसू लागेल. होलोग्राम सक्रीय करण्याचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडेल. सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाइटमधील मजबूत पुतळा उभारण्याचे काम एका अनुभवी मूर्तीकाराकडे सोपविण्यात आले आहे. या मूर्तीकाराविषयी जाणून घेण्यासाठी पुढे वाचत राहा....

सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाइटमधील मजबूत पुतळा उभारण्याचे काम नॅशनल मॉडर्न आर्ट गॅलरीचे (National Modern Art Gallery) महासंचालक अद्वैत गडनायक (Adwaita Gadanayak) यांच्याकडे देण्यात आले आहे. ओडिशात जन्मलेल्या गडनायक यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती घडविण्याच काम मिळताच आनंद झाल्याचे सांगितले. एक मूर्तीकार म्हणून पंतप्रधान मोदी यांनी मला मोठी संधी दिली आहे; असे अद्वैत गडनायक म्हणाले. 

मूर्तीसाठी काळा जेड ग्रॅनाइट दगड (black jade granite stone) वापरला जाईल. हा दगड तेलंगणा येथून मागण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने मूर्ती नेमकी कशी हवी आहे हे आधीच कळवले आहे. मूर्तीचे डिझाइन (रचना) निश्चित केले आहे. आता मूर्ती घडविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल; असे अद्वैत गडनायक यांनी सांगितले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा २८ फूट उंच आणि सहा फूट रूंद असेल. इंडिया गेट येथे चार खांबांचा एक दगडी मंडप आहे. या ठिकाणी आधी पाचव्या जॉर्ज राजाचा पुतळा होता. इंग्रजांच्या काळात उभारण्यात आलेला हा पुतळा १९६८ मध्ये हटविण्यात आला. यानंतर मंडपात पुतळ्याची जागा रिक्त झाली, तिथे अद्याप कोणाचाही पुतळा उभारण्यात आलेला नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा या दगडी मंडपात (चबुतरा) उभारण्यात येईल. 

देश रविवार २३ जानेवारी २०२२ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती साजरी करणार आहे. या शुभ प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा होलोग्राम सक्रीय केला जाईल. पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर होलोग्रामच्या जागेवर पुतळा स्थापन केला जाईल. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा स्थापन झाल्यानंतर रायसीना टेकडीवरून (रायसीना हील) सहज डोळ्यांनी बघता येईल. 

भारताचे राष्ट्रपती भवन दिल्लीतल्या रायसीना टेकडीवर आहे. या टेकडीवरून पुतळा सहज बघता येईल अशीच रचना केली जाणार आहे. सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा म्हणजे त्यांनी देशासाठी केलेल्या अतुलनीय कार्याचा देश कायम ऋणी आहे आणि राहील हे सांगण्याचा प्रयत्न आहे; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी