संसदेत ‘जय श्री राम’च्या घोषणाबाजीवर नवनीत राणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या हे योग्य ठिकाण नव्हे

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 17, 2019 | 19:44 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

१७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाची आजपासून सुरूवात झाली.आज पहिल्या दिवशी सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली.शपथविधी दरम्यान झालेल्या ‘जय श्री राम’च्या घोषणाबाजीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नाराज

Navneet Kaur Rana
संसदेतील घोषणाबाजीवर नवनीत राणांची प्रतिक्रिया  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये निवडून आलेल्या सर्व खासदारांना आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या सदस्यपदाची शपथ दिली गेली. यावेळी सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. त्यानंतर पीठासीन अध्यक्षांच्या पॅनलमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसचे के. के. सुरेश, बीजू जनता दलाचे के. बी. महताब आणि भाजपच्या ब्रजभूषण शरण सिंह यांनी शपथ घेतली. या तीन सदस्यांनी शपथ घेतल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रस्तेविकास आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी, रसायन आणि खते मंत्री डीवी सदानंद गौडा, एचआरडी मंत्री रमेश पोखरियाल निशंक, आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि महिला व बालविकास मंत्री स्मृति इराणी यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्वांनी लोकसभेची शपथ घेतली. त्यानंतर इतर सर्व खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

जेव्हा संसदेचे नवनिर्वाचित खासदार शपथ घेत होते तेव्हा संसदेत ‘जय श्री राम’च्या घोषणा सुरू होत्या. यावर अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा यांनी हे ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यासाठी योग्य ठिकाण नसल्याचं म्हटलंय. यासाठी देऊळ आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, सर्व देव एकसारखे असतात. पण कोणत्याही एकाला टार्गेट करणं, त्याचं सतत नाव घेणं, हे चुकीचं आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा पश्चिम बंगाल इथले खासदार बाबुल सुप्रियो आणि देबश्री चौधरी हे शपथ घेण्यासाठी उभे झाले तेव्हा भाजपच्या काही सदस्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी शपथ घेताच नेत्यांनी घोषणा सुरू केल्या आणि महिला आणि बालविकास राज्यमंत्री चौधरी शपथ घेईपर्यंत घोषणा सुरूच होत्या. सुप्रियो पश्चिम बंगालच्या आसनसोल आणि देबश्री चौधरी रायगंज मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपचे १८ खासदार निवडून आले आहेत.

आपल्याला माहितीच आहे की, लोकसभा निवडणुकीतील प्रत्येक टप्प्यात आणि प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. तसंच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी समोर काही भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या, तेव्हा ममता दीदी खूप चिडून गेल्या होत्या. त्यावेळी सात तरुणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी