first multiplex in the state will soon start in Jammu and Kashmir : श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर येथे राज्यातले पहिले मल्टिप्लेक्स लवकरच सुरू होणार आहे. दहशतवादी हिंसेचे थैमान घालत असल्यामुळे देशाच्या उर्वरित भागांमध्ये मल्टिप्लेक्सची साखळी निर्माण झाली तरी जम्मू काश्मीरमध्ये एकही मल्टिप्लेक्स नव्हते. अखेर हा दुष्काळ आता संपणार आहे. लवकरच जम्मू काश्मीरमध्ये राज्यातले पहिले मल्टिप्लेक्स सुरू होत आहे.
जम्मू काश्मीरमध्ये आधी सिंगल स्क्रीन थिएटर होती. पण दहशतवादी कारवाया वाढू लागल्या आणि हळू हळू थिएटर बंद झाली. सिनेमा बघण्यासाठी संध्याकाळी किंवा रात्री घराबाहेर पडण्याचे प्रमाण एकदम कमी झाले. पण कलम ३७० आणि ३५ अ हटविल्यानंतर आणि सुरक्षा पथकांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केल्यानंतर परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे.
जम्मू काश्मीरमधील पहिल्या मल्टिप्लेक्समध्ये तीन थिएटर मिळून ५२० आसनांची सोय आहे. श्रीनगरचे व्यावसायिक विकास धर आणि आयनॉक्स लेश्युअर संयुक्तपणे मल्टिप्लेक्स सुरू करत आहेत. या मल्टिप्लेक्समधील तिन्ही थिएटरमध्ये टू के रिझोल्युशनच्या स्क्रीन, टू के लेझर प्रोजेक्टर, ७.१ चॅनल साउंड सिस्टिम, आरामदायी आसने (रिक्लाइनर) अशी व्यवस्था आहे. या मल्टिप्लेक्सचा शुभारंभ सप्टेंबर २०२२च्या पहिल्या पंधरवड्यात होणार आहे.
जम्मू काश्मीरच्या नागरिकांसाठी सिनेमा बघण्याची आधुनिक आणि उत्तम सोय मल्टिप्लेक्समुळे निर्माण होणार आहे. यामुळे राज्यातील पहिल्या मल्टिप्लेक्सचे नागरिक उत्साहाने स्वागत करतील आणि उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास विकास धर यांनी व्यक्त केला.