स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिलेला फासावर चढवणार; गुन्हा ऐकल्यावर उडेल थरकाप

First woman to be hanged in Independent India: स्वतंत्र भारतात प्रथमच एका महिलेला फासावर चढवण्यात येणार आहे. यासाठी कारागृहात तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे.

hanged
प्रातिनिधीक फोटो (फोटो सौजन्य: iStockimages) 

मथुरा : स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फासावर चढवण्यात येणार आहे. उत्तरप्रदेशातील मथुरा येथील कारागृहात या महिलेला फाशी देण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. फाशी कधी देणार याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीये. मात्र, लवकरच या महिला कैद्याला फाशी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मथुरा कारागृहात बंद असलेली शबनम नावाच्या महिला कैद्याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे. त्यानंतर आता शबनम हिला उत्तरप्रदेशातील एकमेव महिला फाशीघरात तिला फासावर चढवण्यात येणार आहे. मथुरा कारागृहात करण्यात आलेली ही व्यवस्था ब्रिटिशकालीन आहे. निर्भयाच्या आरोपींना फासावर चढवणारा मेरठचा जल्लाद हा शबनमला फाशी देणार आहे. यासाठी त्याने दोनवेळा फशीघराची पाहणी सुद्धा केली आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमरोहा येथे राहणारी शबनम हिने एप्रिल २००८ साली आपल्या प्रियकरासोबत मिळून ७ जणांची कुऱ्हाडीने हत्या केली होती. अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गावात १५ एप्रिल २००८ रोजी गावातील एका तरुणीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकूण नागरिक जमा झाले. ग्रामस्थ जेव्हा तिच्या घरी दाखल झाले तेव्हा परिवारातील सात जण रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडलेले होते. अशा परिस्थितीत २५ वर्षीय शबनम ओरडून-ओरडून सर्वांना सांगत होती की, दरोडेखोरांनी तिच्या कुटुंबीयांची हत्या करुन फरार झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना शबनमवर संशय आला आणि त्यांची या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. यानंतर तपासात संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोर आला.

प्रेम संबंधांमुळे केलं धक्कादायक कृत्य

पोलिसांच्या मते, २५ वर्षीय शबनम हिने आपल्या प्रियकरासोबत मिळून संपूर्ण घटना घडवून आणली. पोस्ट ग्रॅज्युएट आणि व्यवसायाने शिक्षिका असलेल्या शबनमला पाचवी पास सलीमसोबत प्रेम झाले होते. मात्र, परिवारातील सदस्यांना हे मान्य नव्हते. याच दरम्यान शबनम गर्भवती झाली. यानंतर दोघांनी कुटुंबाची हत्या करण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार, १५ एप्रिल २००८ रोजी शबनमने कुटुंबीयांच्या जेवणात औषध मिसळले आणि त्यानंतर सर्व बेशुद्ध झाले. मग, प्रियकरासोबत मिळून तिने कुटुंबातील एका-एक सदस्याची कुऱ्हाडीने हत्या केली.

पोलिसांनी आपल्या तपासानंतर शबनम आणि तिच्या प्रियकराला अटक केली. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडही जप्त केली. न्यायालयाने या प्रकरणात शबनम आणि सलीम दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. कारागृहात गेल्यावर सात महिन्यांनी गरोदर असलेल्या शबनम हिने एका मुलाला जन्म दिला. अनेक वर्षे हा मुलगा शबनम सोबत होता. २०१५ साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यावर शबनम हिने या मुलाला आपल्या मित्र आणि त्याच्या पत्नीकडे सोपवले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी