तृणमूलचे पाच खासदार भाजपच्या वाटेवर...

five tmc mps will resign and join bjp claims bjp mp arjun singh प. बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे पाच खासदार भाजपच्या वाटेवर आहेत, असा दावा खासदार अर्जुन सिंह यांनी केला.

five tmc mps will resign and join bjp claims bjp mp arjun singh
तृणमूलचे पाच खासदार भाजपच्या वाटेवर... 

थोडं पण कामाचं

  • तृणमूलचे पाच खासदार भाजपच्या वाटेवर...
  • तृणमूल काँग्रेसचे सुवेंदु अधिकारी आणि त्यांच्या समर्थकांचा गट पक्षाच्या नेतृत्वावर नाराज
  • सुवेंदु अधिकारी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला (All India Trinamool Congress - TMC) लवकरच मोठा धक्का बसणार आहे. तृणमूलचे पाच खासदार भाजपच्या वाटेवर आहेत, असा दावा भाजप (Bharatiya Janata Party - BJP) खासदार अर्जुन सिंह यांनी केला. भाजपचा हा दावा म्हणजे राजकीय स्टंट आहे, या दाव्यात तथ्य नाही, असे तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय म्हणाले. (five tmc mps will resign and join bjp claims bjp mp arjun singh)

बनावट बातम्या पसरवणे आणि गोंधळ माजवणे यात भाजपचे पश्चिम बंगालमधील सहप्रभारी अमित मालवीय हुशार आहेत. त्यांच्या इशाऱ्यावरुन तृणमूलचे खासदार राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी केला. तृणमूल काँग्रेसचे खासदार एकनिष्ठ आहेत आणि ते कोणत्याही परिस्थितीत पक्षांतर करणार नाही, असेही सौगत राय म्हणाले.

याआधी अर्जुन सिंह यांनी सौगत राय आणि तृणमूलचे चार अन्य खासदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, असे वक्तव्य केले होते. अर्जुन सिंह यांच्या वक्तव्याला पश्चिम बंगालमधील माध्यमांकडून महत्त्व दिले जात आहे. कारण तृणमूल काँग्रेसचे सुवेंदु अधिकारी आणि त्यांच्या समर्थकांचा गट पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. सुवेंदु अधिकारी मागील काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांपासून चार हात दूर राहणे पसंत करत आहेत. अलिकडेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही ते गैरहजर राहिले होते. तृणमूल काँग्रेसमध्येच सुवेंदु अधिकारी आणि त्यांचे समर्थक पक्षातून बाहेर पडणार अशी चर्चा जोर धरत आहे. अशा वातावरणात अर्जुन सिंह यांच्या वक्तव्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व आले आहे.

पूर्वी मिदनापूर (Purba Medinipur) येथे झालेल्या एका राजकीय कार्यक्रमात बोलताना सुवेंदु अधिकारी यांनी आपण पूर्ण वेळ राजकारणी आहोत, असे सांगितले होते. आता ते नाराज असल्याची चर्चा जोर धरत आहे त्यामुळे सुवेंदु अधिकारी तृणमूल काँग्रेसला धक्का देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार का यावरुन चर्चेला उधाण आले आहे. 

सौगत रॉय यांनी भाजप राजकीय अफवा पसरवत असल्याचे सांगितले तरी अर्जुन सिंह त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर तृणमूल काँग्रेसचे नेता म्हणून उभे राहणारे सौगत रॉय तसेच तृणमूलचे चार अन्य खासदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. 

सुवेंदु अधिकारी हे पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री आणि तृणमूल काँग्रेसमधील एक दिग्गज नेता आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला राज्याची सत्ता मिळवून देण्यासाठी ज्या नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली यात सुवेंदु अधिकारी हे नाव घेतले जाते. पण ममता बॅनर्जी यांनी भाचा अभिजीत बॅनर्जी याला महत्त्व देण्यास सुरुवात केल्यापासून तृणमूलचे अनेक दिग्गज नेते दुखावले आहेत. यात सुवेंदु अधिकारी यांचाही समावेश होतो. अनेक दिवस राज्यात पर्याय नसल्यामुळे गप्प असलेले सुवेंदु अधिकारी राजकीय पर्याय दिसू लागताच जाहीरपणे नाराजी प्रकट करू लागले आहेत. 

मागील काही दिवसांत सुवेंदु अधिकारी यांच्या समर्थकांपैकी निवडक सदस्यांच्या विरोधात राज्यात खटले उभे राहिले आहेत, पोलीस चौकशी सुरू आहे. या प्रकारांची तीव्रता वाढू लागली आहे. सुवेंदु अधिकारी यांच्या राजकीय कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार लक्षात येताच भाजपने उघडपणे सुवेंदु अधिकारी यांचे समर्थन करायला सुरुवात केली आहे. याच कारणामुळे सुवेंदु अधिकारी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी