Assam Flood : पुरामुळं आसाममध्ये जनजीवन विस्कळीत, 28 जिल्ह्यांना फटका, 19 लाखांहून जास्त लोकांना पुराचा तडाखा पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन

आसाममध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसामच्या चिरांग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्या ठिकाणची हजारो लोक बाधित झाले आहेत. अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

Floods disrupt life in Assam, hit 28 districts
पुरामुळं आसाममध्ये जनजीवन विस्कळीत, 28 जिल्ह्यांना फटका  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • SDRF च्या पथकांनी 100 हून अधिक जणांची सुखरुप सुटका केली आहे.
  • 28 जिल्ह्यांतील 2 हजार 930 गावांतील 19 लाख लोक बाधित झाले आहेत.
  • एक लाखाहून जास्त लोकांना घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला.

Assam Flood : आसाममध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसामच्या चिरांग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्या ठिकाणची हजारो लोक बाधित झाले आहेत. अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. पुरामुळे शनिवारी आणखी 9 जणांचा मृत्यू झाला. याबरोबरच पूर आणि भूस्खलनामुळे (Landslide) मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 55 झाली आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांतील 19 लाखांहून जास्त लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. एक लाखाहून जास्त लोकांना घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. 

दरम्यान, SDRF च्या पथकांनी 100 हून अधिक जणांची सुखरुप सुटका केली आहे. हे सर्वजण पुरात अडकले होते. या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान, पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये 43 हजार 338 हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. बेकी, मानस, पगलाडिया, पुथिमारी, जिया भराली, कोपिली येथे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या 373 मदत केंद्रात 1 लाख 8 हजार 104 पूरग्रस्त लोक राहत आहेत. तर, बजली जिल्ह्यात 3.55 लाख, दरंग जिल्ह्यात 2.90 लाख, गोलपारा येथे 1.84 लाख, बारपेटा 1.69 लाख, नलबारी 1.23 लाख, कामरूपमध्ये 1.19 लाख आणि होजई जिल्ह्यात 1.05 लाख लोक बाधित झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं मदतीचं आश्वासन

आसाममध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी बोलून परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासनही दिले आहे. खुद्द मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांनी ही माहिती दिली आहे. 

28 जिल्ह्यांना पुराचा फटका

राज्यातील 35 जिल्ह्यातील 28 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या 28 जिल्ह्यांतील 2 हजार 930 गावांतील 19 लाख लोक बाधित झाले आहेत. मुसळधार पावसानंतर दरड कोसळून दोन मुलांसह नऊ जणांना जीव गमवावा लागला आहे. या पुरामुळं आत्तापर्यंत 55 लोकांचा मृत्यू झाला आहे. खेड्यापाड्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्यानं घरं पाण्याखाली जात आहेत. इतकेच नाही तर येथील जवळपास 64 रस्त्यांचा संपर्क तुटला आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी