Assam floods: आसाममधील पुरामुळे 7 जिल्ह्यांतील सुमारे 57,000 लोक प्रभावित, अनेक गाड्या रद्द

पावसाळ्यापूर्वी आसाममध्ये (Assam) आलेल्या पुरामुळे (Flood) लोकांची अवस्था बिकट झाली आहे. राज्यातील सात जिल्ह्यांतील 57,000 लोकांना पुराचा फटका बसला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 25 महसूल मंडळातील सुमारे 222 गावांना या पुराचा तडाखा बसला आहे. तर 10321.44 हेक्टर शेतजमीन (Farmland) पुरात बुडाली आहे.

Floods in Assam affect about 57,000 people in 7 districts
आसाममधील पुरामुळे 7 जिल्ह्यांतील सुमारे 57,000 लोक प्रभावित  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 10321.44 हेक्टर शेतजमीन पुरात बुडाली
  • भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून रेल्वे रुळांचे नुकसान
  • डितोकचेरा स्थानकात अडकलेल्या सुमारे 1,245 प्रवाशांना बदरपूर आणि सिलचर येथे आणण्यात आले.

गुवाहाटी : पावसाळ्यापूर्वी आसाममध्ये (Assam) आलेल्या पुरामुळे (Flood) लोकांची अवस्था बिकट झाली आहे. राज्यातील सात जिल्ह्यांतील 57,000 लोकांना पुराचा फटका बसला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 25 महसूल मंडळातील सुमारे 222 गावांना या पुराचा तडाखा बसला आहे. तर 10321.44 हेक्टर शेतजमीन (Farmland) पुरात बुडाली आहे. पुरामुळे एका लहान मुलासह तिघांना जीव गमवावा लागला आहे. या आपत्तीत आतापर्यंत 202 घरांचे नुकसान झाले आहे. राज्यात 18 मे पर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

पूरग्रस्त भागात मदतकार्य

लष्कर, निमलष्करी दल, एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांनी पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य केले आहे. होजई, लखीमपूर आणि नागाव जिल्ह्यातील रस्ते, पूल आणि कालवे पाण्याखाली गेले आहेत. शनिवारी झालेल्या संततधार पावसामुळे दिमा हासाओ जिल्ह्यातील 12 गावांमध्ये दरड कोसळल्या. भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून रेल्वे रुळांचे नुकसान झाले आहे. डोंगराळ भागातही दळणवळण सेवेवर परिणाम झाला आहे. 

रेल्वे सेवा प्रभावित

लुमडिंग विभागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. हे लक्षात घेऊन ईशान्य सीमारेल्‍वेने गाड्यांच्या संचलनात अनेक बदल केले आहेत. पूर आणि पावसामुळे या मार्गावरील दोन गाड्या अडकल्या. या गाड्यांमध्ये सुमारे 1400 प्रवासी आहेत. हवाई दल, एनडीआरएफ, आसाम रायफल्स आणि स्थानिक लोकांच्या मदतीने या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. 

119 प्रवाशांचं एअरलिफ्ट 

डितोकचेरा स्थानकात अडकलेल्या सुमारे 1,245 प्रवाशांना बदरपूर आणि सिलचर येथे आणण्यात आले आहे, तर 119 प्रवाशांना सिलचरला विमानाने नेण्यात आले आहे. या अडकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात 18 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी