Floods in Pakistan : Tomato prices hiked up to rupees 500 in Lahore amid Inflation : महागाईचा सामान्य नागरिकांना जबर तडाखा बसला आहे. टोमॅटो ५०० रुपये किलोच्या दराने बाजारात मिळत आहे. धान्य, भाज्या, फळे यांच्या बाजारभावाने एकदम उसळी मारली आहे. कांदा २५० ते ३५० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. आलं आणि लसूण यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सामान्यांसाठी एक टोमॅटो खरेदी करणे पण कठीण होत आहे. पुरामुळे पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमध्ये देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा पूर आला आहे. या पुरात आतापर्यंत ३४८ मुलांसह एक हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अब्जावधी रुपयांची वित्तहानी झाली आहे. सिंध, खैबर पख्तुनख्वा, गिलगिट बाल्टिस्तान, बलुचिस्तान आणि पंजाब या पाच प्रांतातील नागरिकांना पुराचे प्रतिकूल परिणाम सहन करावे लागत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार तीन कोटींपेक्षा जास्त नागरिकांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. काही तज्ज्ञ पाच कोटी नागरिकांना फटका बसल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत.
पाकिस्तानची हजारो एकर शेती पुराच्या तडाख्याने वाया गेली. साठवलेले अन्नधान्य पण मोठ्या प्रमाणावर वाहून गेले. यामुळे पाकिस्तानमध्ये धान्य, भाज्या, फळे यांची टंचाई निर्माण झाली आहे. उपलब्ध धान्य, भाज्या, फळे चढ्या दराने विकण्यास सुरुवात झाली आहे. यामुळेच महागाईचा आगडोंब उसळला आहे.
सिंध आणि पंजाब प्रांतात ऊस आणि कापसाचे सगळी शेती वाहून गेली आहे. कांदा, टोमॅटो आणि खरिपातील मिरचीच्या शेतीलाही पुराचा तडाखा बसला आहे. सिंध प्रांतात सरकारी गोदामात साठवलेला २० लाख टन गहू पाऊस आणि पुराचा तडाखा बसल्यामुळे भिजून खराब झाला आहे. पुरामुळे पाकिस्तानमधून होणाऱ्या निर्यातीत यंदाच्या आर्थिक वर्षात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
पुराचा तडाखा बसल्यामुळे पाकिस्तानच्या वीज निर्मितीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विजेअभावी पाकिस्तानचे उरलेसुरले उद्योगधंदे बंद आहेत. कृषी आणि औद्योगिक उत्पन्नात लक्षणीय घट होणार असल्यामुळे पाकिस्तानची आधीच संकटात असलेली अर्थव्यवस्था आणखी अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत.