Bridge Collapsed | उद्घाटन (Inauguration) सुरु असताना अचानक पूल कोसळला (Bridge Collapsed) आणि प्रमुख पाहुण्यांसह उद्घाटनासाठी आलेले सगळे खालच्या गटारात पडल्याची (Fell down) घटना नुकतीच समोर आली आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी अनेकजणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र अपेक्षेपेक्षा फारच गर्दी या कार्यक्रमासाठी जमली होती. उद्घाटन सुरु असताना सगळी गर्दी त्या पुलावर जमल्यामुळे त्या वजनानं पुलानं मान टाकली आणि प्रमुख पाहुण्यांसह सर्वजणच खाली कोसळले.
ही घटना घडली मेक्सिकोमधील क्वेर्निवाका शहरात. शहरातील नदीपाशी एका फूटओव्हर ब्रिजचं उद्घाटन करण्यात येत होतं. शहराच्या महापौरांना त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. लाकूड आणि लोखंड यांच्या मिश्रणातून हा पूल तयार करण्यात आला असून काही दिवसांपूर्वीच तो कोसळला होता. हा पूल पुन्हा कोसळू नये, याची खबरदारी घेण्याचं आवाहन कंत्राटदाराला करण्यात आलं होतं. मात्र अगदी उद्घाटनाच्या दिवसापुरताही हा पूल तग धरू शकला नाही. यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त होतंय.
या कार्यक्रमासाठी आलेले शहराचे महापौर, त्यांच्या पत्नी आणि इतर सगळे मान्यवर पूल कोसळल्यानंतर त्याखाली असणाऱ्या गटारात जाऊन पडले. शहरातील अनेक मान्यवर अधिकारी आणि पत्रकारही घटना घडली त्यावेळी या पुलावर उपस्थित होते. सर्वजण खाली कोसळले. उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असताना काही वेळातच तिथं गर्दी जमायला सुरुवात झाली. हा फूटओव्हर ब्रिज असल्यामुळे उद्घाटन सोहळ्यात आपणही सहभागी व्हावं, या उद्देशाने आजूबाजूचे नागरिकही तिथं जमले. काही वेळात वजन अधिक झाल्याने हा पूल डोलू लागला. काही क्षणांतच पुलाचा एक भाग कोसळला. मात्र हे लक्षात येऊन तिथून निघण्यासाठी पुरेसा वेळ कुणालाच मिळाला नाही. पुढच्या काही क्षणांतच अख्खा पूल खाली कोसळला आणि सगळेजण खाली पडले.
Cae alcalde de Cuernavaca, José Luis Urióstegui y su esposa durante la reinauguración del paso Rivereño en Amanalco, el puente colgante se rompió, también están lesionados regidores y la Síndico — N+ Morelos (@nmasmorelos) June 7, 2022
Información: @Reportero1965 pic.twitter.com/x60I7b0GIB
महापौर, त्यांच्या पत्नी, अधिकारी, पत्रकार आणि नागरिक असे सगळेच खाली कोसळले. त्यातील काहींना किरकोळ जखमा झाल्या आहेत, तर काहींच्या जखमा या तुलनेने गंभीर आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करून घरी सोडलं जात आहे. कुणालाही जीवघेणी जखम झाली नसून सगळ्यांची तब्येत ठीक असल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे.
ही घटना घडली तेव्हा पुलाच्या खालूनही काहीजण या उद्घाटन सोहळ्याचं चित्रिकरण करत होते. त्यांच्या कॅमेऱ्यात पूल कोसळल्याची ही घटना कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. कशा प्रकारे हा पूल कोसळला आणि प्रमुख पाहुण्यांसह सगळे खाली पडले, याची हा व्हिडिओ पाहून कल्पना येऊ शकते. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे काही क्षण गोंधळ उडाला खरा, पण लवकरच सगळेजण त्यातून सावरले आणि स्वतःवरच हसत आपापल्या घरी निघून गेले. मात्र नवीनच बांधलेला पूल कोसळल्यामुळे पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्चनिचन्ह निर्माण झालं आहे.