आता भारतीय एसी आणि एलईडी लाईटचा होणार बोलबाला, सुट्या भागांच्या उत्पादनांसाठी पीएलआय स्कीम झाली लागू

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 18, 2021 | 14:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

सध्या भारतात एसी (AC)आणि एलईडी ( LED)लाईटच्या सुट्या भागांची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. या आयातीत सर्वात मोठा हिस्सा चीनचा आहे. या सुट्या भागांची आयात करून भारतात एलईडी लाईट आणि एसीचे उत्पादन केले जाते.

For AC & LED lights components, government launches PLI scheme
एसी आणि एलईडीच्या उत्पादनात भारत बनणार स्वावलंबी 

थोडं पण कामाचं

  • एसी आणि एलईडी लाईट सुट्या भागांचे उत्पादन देशातच
  • सरकारची पीएलआय योजना
  • भारतात सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्यांना सवलत

नवी दिल्ली : पुढील दोन वर्षात भारतातच एसी आणि एलईडी लाईटचे सुटे भाग बनण्यास सुरूवात होईल. सरकारने एसी आणि एलईडी लाईटच्या सुट्या भागांवर उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (पीएलआय) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात निर्माण झालेल्या या सुट्या भागांच्या विक्रीतील दरवर्षीच्या वाढीवर सरकार उत्पादक कंपन्यांना चार ते सहा टक्क्यांपर्यत प्रोत्साहन देणार आहे. या कंपन्यांनादेखील दर वर्षी आपला उत्पादन प्रकल्प आणि यंत्रांमधील गुंतवणुकीमध्ये वाढ करावी लागणार आहे. पाच वर्षात ६,२३८ कोटी रुपयांची सवलत देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.

एसी आणि एलईडीचे सुटे भाग


सध्या भारतात एसी (AC)आणि एलईडी ( LED)लाईटच्या सुट्या भागांची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. या आयातीत सर्वात मोठा हिस्सा चीनचा आहे. या सुट्या भागांची आयात करून भारतात एलईडी लाईट आणि एसीचे उत्पादन केले जाते. सरकारने ही स्पष्ट केले आहे की आयात केलेल्या सुट्या भागांची जोडणी करून उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्यांना ही सवलत किंवा लाभ मिळणार नाही.

उद्योग विभागाची अधिसूचना


उद्योग विभागाने यासाठीची अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार एसीशी संबंधित कॉम्प्रेसर, कॉपर ट्यूब, अॅल्युमिनियम फॉईल, पीसीबी असेंब्ली ऑफ कंट्रोलर्स, बीएलसीडी मोटर्स, सर्व्हिस व्हाल्व आणि क्रॉस फ्लो फॅन यासारख्या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

पीएलआय योजना


चिप पॅकेजिंग, एलईडी चिप, एलईडी ड्राईव्हर्स, एलईडी इंजिन, पॅकेंजिंग, मॉड्युल्स, रेजिस्टर्स, आयसी, फ्युज, वायर इंडक्टर यासारख्या एलईडी लाईटसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सरकारच्या योजनेचा लाभ मिळेल. पीएलआय योजनेसाठी मोठे, मध्यम आणि छोट्या गुंतवणुकीची वर्गवारी करण्यात आली आहे. भारतातील एसीच्या बाजारपेठेत दरवर्षी १० टक्क्यांपेक्षा वाढ होते आहे. तर एलईडी लाईट्समध्ये भारत प्रमुख निर्यातदार बनतो आहे. मात्र एसी आणि एलईडी लाईटसाठीच्या सुट्या भागांची भारत मोठ्या प्रमाणावर आयात करतो.

स्पर्धेतील स्थान

मागील काही वर्षांपासून सरकार विविध क्षेत्रातील भारताच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करून त्या वस्तूंचे उत्पादन भारतातच करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी सरकार विविध योजना पुढे आणत आहे. विविध उत्पादनांवरील सुट्या भागांसाठी भारत आजही मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. त्यामुळे अंतिम उत्पादनासाठी भारत आयात केल्या जाणाऱ्या मालाच्या पुरवठ्यावरच अवलंबून असतो. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताला आपल्या उत्पादनांचा चांगला पाया घालता येत नाही.

आयात केल्या जाणाऱ्या सुट्या भागांच्या पुरवठ्यात अस्थिरता निर्माण झाल्यास त्याचा विपरित परिणाम देशातील कंपन्यांच्या उत्पादनावर आणि त्यांच्या निर्यातीवर होत असतो. शिवाय सुट्या भागांच्या किंमतींवरच अंतिम उत्पादनाची किंमत अवलंबून असल्याने भारतीय उत्पादनांच्या किंमतीवर भारताचे पूर्ण नियंत्रण राहत नाही. त्यामुळे जागतिक स्पर्धेत भारतीय उत्पादनांना पुरेशी आघाडी घेता येत नाही. यासाठीच सरकारने एसी आणि एलईडीच्या क्षेत्रासाठी ही पीएलआय योजना आणली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी