Shameful Incident : शाळेतील दोन दलित मुलींना सर्वांसमोर ड्रेस काढण्याची सक्ती, आक्षेप घेणाऱ्या पालकांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न

चौथीत शिकणाऱ्या दोन दलित मुलींना शिक्षकांनी सर्वांसमोर ड्रेस काढायला लावल्याची लाजीरवाणी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.

Shameful Incident
शाळेतील दोन दलित मुलींना सर्वांसमोर ड्रेस काढण्याची जबरदस्ती  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • दोन दलित मुलींवर शाळेतील शिक्षकांकडूनच अन्याय
  • सर्वांसमोर अंगातील ड्रेस काढण्याची जबरदस्ती
  • पालकांवर प्रकरण दडपण्यासाठी दबाव

Shameful Incident : चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुलींना सर्वांसमोर अंगातील ड्रेस काढायला लावण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरपूरमध्ये ही घटना घडली असून त्यामुळे शिक्षण विभागही हादरून गेला आहे. उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागानं या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. राष्ट्रीय अनुसुचित जात आयोगाने उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागाला या प्रकरणी कृती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशभरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून हे कृत्य करणाऱ्या शिक्षकांना कोण आणि कशासाठी पाठिशी घालत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

काय आहे घटना?

मुजफ्फरनगरच्या हापूर भागातील एका शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन दलित मुलींना त्यांचे युनिफॉर्म काढून इतर दोन उच्चवर्णीय मुलींना देण्याची सूचना शिक्षकांनी केली. 11 जुलै रोजी ही घटना घडली. इतरांना युनीफॉर्म घालून ग्रुप फोटो घ्यायचा असल्यामुळे या दोन मुलींनी आपल्या अंगावरील ड्रेस काढून त्यांना द्यावा, अशी सूचना शिक्षकांनी केली. मुलींनी त्याला विरोध केला. त्यावर मुलींना दमदाटी करून आणि शाळेतून काढून टाकण्याची धमकी देत त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यांना आपल्या अंगावरील युनिफॉर्म काढून देण्यास भाग पाडण्यात आलं. या प्रकाराची वाच्यता बाहेर केल्यास शाळेतून काढून टाकण्याची तंबीही या मुलींना देण्यात आली होती. 

वडिलांनी केली तक्रार

या दोनपैकी एका मुलीच्या वडिलांना हा प्रकार समजला. त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र या प्रकऱणाची वाच्यता करू नये आणि ते दडपून टाकावं यासाठी शाळेकडून दबाव आल्याची माहिती त्यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली. पोलिसांनीदेखील एफआयआर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. 

अधिक वाचा - Breaking News 19 July 2022 Latest Update: , कोकणात पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस

पोलिसांकडून टाळाटाळ

ही घटना प्रकाशझोतात आल्यानंतर या विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित दोन्ही शिक्षकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र पोलिसांकडून प्रकरणाची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. शोषित क्रांती दल या सामाजिक संस्थेने या प्रकरणी सोशल मीडियावरून आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी आपली भूमिका बदलल्याची चर्चा आहे. मुलींच्या वडिलांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. 

अधिक वाचा - चिंता वाढवणारी बातमी..!, मंकीपॉक्सनं वाढवली डोकेदुखी; 'या' राज्यात आढळला दुसरा रूग्ण

शिक्षकांकडून दबावतंत्र

या घटनेला आठ दिवस उलटूनदेखील एफआयआर दाखल झाली नसल्याचा दावा शोषित क्रांती दलानं केला आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षकच पंचायत बोलावून इतरांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असून ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, महिला पोलिसांकरवी दोन्ही मुलींचे जबाब नोंदवण्यात आल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. या प्रकारामुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी