गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक 

Keshubhai Patel Died at 92: गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे वयाच्या 92व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. आज (गुरुवार) गुजरातमधील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

keshubhai_patel
गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले
  • केशुभाई पटेल हे गुजरातमधील भाजपाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते
  • १९९५ आणि १९९८ मध्ये ते दोनदा राज्याचे मुख्यमंत्री झाले होते

अहमदाबाद: गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे आज निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना अहमदाबादच्या स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र आज (गुरुवार) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूची लागणही झाली होती. त्यावर त्यांनी मात देखील केली होती. पण त्यानंतर काही दिवसांनी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला होता. कालपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली.

दरम्यान, केशुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शोकग्रस्त कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन ज्येष्ठ नेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

केशुभाई पटेल हे गुजरातमधील ज्येष्ठ नेते होते

केशुभाई पटेल हे गुजरातमधील भाजपाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. जनसंघाच्या काळापासून पक्षाशी संबंधित असलेले केशुभाई पटेल हे १९९५ मध्ये पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते. यावेळी गुजरातमध्ये प्रथमच भाजपचे सरकार स्थापन झाले होते. परंतु, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नव्हता. 

ते दुसऱ्यांदा १९९८ मध्ये पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. पण यावेळी देखील त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. २००१ मध्ये त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते.  नरेंद्र मोदी यांनी केशुभाई पटेल यांच्याबरोबर गुजरातच्या राजकारणामध्ये दीर्घकाळ काम केले. 

केशुभाई पटेल यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. पाहा नेमकं काय म्हणाले मोदी: 

केशुभाई पटेल यांचा जन्म २४ जुलै १९२८ रोजी जुनागड येथे झाला होता. त्यांचे प्रारंभिक शिक्षण संपल्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले होते. त्यानंतर बरेच वर्ष ते भाजपमध्ये राहिले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी