Former Haryana CM Omprakash Chautala convicted in disproportionate assets case, verdict on punishment on 26 May : नवी दिल्ली : जाहीर केलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या प्रकरणात हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला दोषी आढळले आहेत. या प्रकरणात चौटाला यांना द्यायच्या शिक्षेबाबत दिल्लीचे राउज अॅव्हेन्यू कोर्ट गुरुवार २६ मे २०२२ रोजी निर्णय जाहीर करणार आहे. दोन दिवसांपूर्वी युक्तिवाद पूर्ण झाला त्यावेळी राउज अॅव्हेन्यू कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय आज (शनिवार २१ मे २०२२) जाहीर करण्यात आला.
ओमप्रकाश चौटाला यांच्या विरोधात सीबीआयने २६ मार्च २०१० रोजी आरोपपत्र दाखल केले होते. चौटाला यांनी १९९३ ते २००६ या कालावधीत आयकर विभागाकडे जाहीर केलेल्या उत्पन्नापेक्षा जास्तीचे असे उत्पन्न कमावले होते. ही अतिरिक्त संपत्ती ६.०९ कोटी रुपये होती. यापैकी ३ कोटी ६८ लाख रुपयांची संपत्ती ईडीने २०१९ मध्ये कारवाई करून जप्त केली होती. जप्त केलेल्या संपत्ती प्रामुख्याने स्थावर मालमत्ता होती. यात सदनिका (फ्लॅट), भूखंड (प्लॉट / जमिनीचा तुकडा), जमीन अशा स्वरुपाची मालमत्ता होती. ईडीने कारवाई करून चौटाला यांची पंचकूला, सिरसा आणि दिल्लीतील संपत्ती जप्त केली होती.
याआधी ओमप्रकाश चौटाला यांना २०१३च्या शिक्षक भरती घोटाळ्यात दोषी आढळल्यामुळे दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. ही शिक्षा पूर्ण करून काही महिन्यांपूर्वीच ओमप्रकाश चौटाला जेलबाहेर आले आहेत.