जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, मारेकऱ्याला अटक

Former Japanese PM Shinzo Abe dies after being shot during speech in west Japan : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची नारा नावाच्या पश्चिम जपानमधील शहरात हत्या करण्यात आली. सुरक्षा यंत्रणेने मारेकऱ्याला शस्त्रासह अटक केली.

Former Japanese PM Shinzo Abe dies after being shot during speech in west Japan
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, मारेकऱ्याला अटक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, मारेकऱ्याला अटक
  • तेत्सुया यामागामी (४१ वर्षे, राहणारा : नारा) असे मारेकऱ्याचे नाव
  • मारेकऱ्याने दिली हत्येची कबुली

Former Japanese PM Shinzo Abe dies after being shot during speech in west Japan : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची नारा नावाच्या पश्चिम जपानमधील शहरात हत्या करण्यात आली. सुरक्षा यंत्रणेने मारेकऱ्याला शस्त्रासह अटक केली. तेत्सुया यामागामी (४१ वर्षे, राहणारा : नारा) असे मारेकऱ्याचे नाव आहे, त्याने हत्येची कबुली दिली.  या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.

माजी पंतप्रधान शिंजो आबे नारा शहरात एक सभा घेत होते. आबे यांचे भाषण सुरू असताना पाठीमागून तेत्सुया यामागामी आला. त्याने कॅमेऱ्यासारख्या दिसणाऱ्या गनमधून गोळीबार केला. अतिशय जवळून २ गोळ्या लागल्यामुळे शिंजो आबे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते सभास्थळी बेशुद्ध पडले. गंभीर जखमी आणि बेशुद्ध झालेल्या अवस्थेत शिंजो आबे यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. पण शिंजो आबे यांना वाचविणे त्यांना शक्य झाले नाही.

शिंजो आबे २००९ पासून जपानचे पंतप्रधान होते. त्यांनी तब्येतीचे कारण देऊन २०२० मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. ते जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले नेते होते. यामुळे त्यांच्या हत्येच्या कारणावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

कॅमेरा गन

जपानच्या माजी पंतप्रधानांवर हल्ला करणाऱ्याने एका कॅमेरा गनचा वापर केला होता. थ्री डी प्रिंटरच्या मदतीने त्याने एक कॅमेऱ्यासारखी दिसणारी गन तयार केली होती. लांबून बघणाऱ्यास फोटो काढण्याचा कॅमेरा वाटेल अशी ही गन होती. यामुळेच सुरक्षा रक्षकांना चकवून गन घेऊन शिंजो आबे यांच्या सभास्थळी उपस्थित राहणे मारेकऱ्याला शक्य झाले. त्याने फोटो काढण्याच्या निमित्ताने शिंजो आबे यांच्यापासून काही अंतरावर स्टेजच्या मागील बाजूस उभे राहून गोळीबार केला. सुरुवातीला सर्वांना एक फोटोग्राफर गर्दीचा फोटो काढत असावा असे वाटले पण कॅमेऱ्यासारख्या गनमधून गोळीबार होताच सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला लगेच पकडले.

बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारतीय वेळेनुसार गुरुवार ७ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी राजीनामा दिला. या घटनेला २४ तास होत नाहीत तोच जपानच्या माजी पंतप्रधानांवर गोळीबार झाला. या दोन घटनांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक चक्रावले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो आबे यांच्या हत्येचे वृत्त कळताच दुख व्यक्त केले. जपानमध्ये घडलेल्या घटनेने धक्का बसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारतात एक दिवसाचा दुखवटा

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या झाली. या घटनेची माहिती मिळताच भारत सरकारने शोक प्रकट केला तसेच शनिवार ९ जुलै २०२२ रोजी एक दिवसाचा दुखवटा सरकारी पातळीवर पाळला जाईल असे जाहीर केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी