Sharad Yadav Pass Away : देशाचे माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या मुलीने याला दुजोरा दिला आहे. शरद यादव सध्या राजदमध्ये होते. ७५ वर्षीय आरजेडी नेत्याची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती. (former-union-minister-sharad-yadav-passes-away-confirms-his-daughter)
शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी शरद यादव यांनी ट्विटरवर या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, "पापा आता राहिले नाहीत." प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद यादव यांना गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शरद यादव यांनी 1999 ते 2004 दरम्यान अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये विविध खात्यांवर मंत्री म्हणून काम केले होते. 2003 मध्ये शरद यादव जनता दल युनायटेड JD(U) चे अध्यक्ष झाले. आजमितीस हा पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून बिहारमध्ये सत्तेत आहे. नितीश कुमार आणि शरद यादव ही जोडी बिहारची एकेकाळी हिट राजकीय जोडी होती.
शरद यादव आज लालू प्रसाद यादवांच्या पक्ष आरजेडीसोबत असले तरी एकेकाळी ते लालू यादव यांचे कट्टर विरोधक होते. लालू प्रसाद यादव यांना सत्तेवरून खाली खेचण्यात त्यांचा मोठा हात असल्याचे मानले जाते. त्यांनी लालू प्रसाद यादव यांचा त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मधेपुरातून एकदा पराभव केला आहे. मात्र, नितीश यांच्यापासून दुरावल्यानंतर त्यांनी वेगळा पक्ष काढला आणि नंतर त्यांचा पक्ष लालूंच्या पक्षात विलीन केला.
शरद यादव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी लिहिले - "मंडल मसीहा, राजदचे ज्येष्ठ नेते, महान समाजवादी नेते आणि आदरणीय शरद यादव यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने मी दु:खी झालो आहे. मी काही बोलण्यात असमर्थ आहे.आई आणि भाऊ शंतनू यांच्याशी बोललो.या दु:खाच्या प्रसंगी संपूर्ण समाजवादी परिवार कुटुंबीयांच्या पाठीशी आहे.