Free entry to all ASI-protected monuments : नवी दिल्ली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने ५ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुरातत्व विभागांतर्गत येणाऱ्या देशातील सर्व स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना विनामूल्य प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. या ऐतिहासिक घटनेला ७५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. सरकारने औपचारिक सोहळ्याची सुरुवात १२ मार्च २०२१ रोजी केली. सरकारी सोहळा १५ ऑगस्ट २०२३च्या संध्याकाळी संपणार आहे. या निमित्ताने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती देण्यासाठी केंद्र सरकार वर्षभरापासून देशभर अनेक उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून ५ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुरातत्व विभागांतर्गत येणाऱ्या देशातील सर्व स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना विनामूल्य प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निमित्ताने जास्तीत जास्त पर्यटक भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन पुन्हा एकदा देशाचा जाज्वल्य इतिहास जाणून आणि समजून घेतील. नव्या पिढीला इतिहास समजून घेण्याची सुवर्णसंधी लाभेल.
केंद्र सरकार १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात 'हर घर तिरंगा' मोहिमेच्या माध्यमातून देशभर तिरंगा पोहोचवणार आहे. नागरिकांनी १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत आपापल्या घराच्या खिडकीत, बाल्कनीत (गॅलरी/व्हरांडा) किंवा गच्चीत उंचावर तिरंगा फडवावा असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. 'हर घर तिरंगा' मोहिमेसाठी सरकारी पातळीवरून २७ कोटी राष्ट्रध्वजांचे घरोघरी वाटप करण्याचे काम सुरू आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सरकारी पातळीवर सुरू असलेल्या सर्व उपक्रमांना नागरिकांची भक्कम साथ लाभत असल्याचे चित्र आहे. यामुळे देशात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.