उधार घेतलेले १२० रुपये मागितल्याने 'त्याने' केली मित्राचीच हत्या

Man beats friend to death: असं म्हटलं जात की, संकटात मदत करतो तोच खरा मित्र. मात्र, आता अशी एक घटना समोर आली आहे जेथे मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केली आहे. 

friend murder killed Rs 120 beaten death uttar pradesh crime news
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • मित्राला उधार दिलेले १२० रुपये परत न दिल्याने मारहाण
  • बिरजू कुमार याने आपला मित्र रामू याच्याकडून घेतली होती उधारी
  • उधार घेतलेले पैसे मागितल्याने आरोपी बिरजू याने रामूला केली मारहाण 

बरेली: आपल्या मित्राला उधार दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. उत्तरप्रदेशातील लखिमपूर खेरी जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. १२० रुपयांवरुन झालेल्या वादानंतर आरोपीने आपल्याच मित्राला मारहाण केली आणि या मारहाणीत रामू नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरोपीचं नाव बिरजू कुमार असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मृतक रामू याच्या मुलाच्या मते, बिरजू कुमार याने आपले वडील रामू यांच्याकडून पैसे उधार घेतले होते. जेव्हा माझ्या वडिलांनी बिरजू कुमार यांच्याकडे पैसे मागितले तेव्हा त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी माझ्या वडिलांनी बिरजू कुमार याला विरोध केला तेव्हा त्याने वडिलांना काठीने मारहाण केली. 

बिरजू कुमार याने केलेल्या मारहाणीत रामू गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बिरजू कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. 

मृतक ४५ वर्षीय रामू आणि आरोपी बिरजू कुमार हे दोघेही एकाच गावात राहतात. बिरजू कुमार याला पैशांची गरज होती तेव्हा रामू यानेच मदत केली. मात्र, जेव्हा रामूने आपले पैसे पुन्हा मागितले तेव्हा संतप्त झालेल्या बिरजू कुमार याने त्यालाच मारहाण केली आणि या मारहाणीत रामूचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक अजय मिश्रा यांनी सांगितले की, या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी लखिमपूर जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी