Vijay Mallya: विजय मल्ल्यानं युरोपमधल्या बँकांनाही सोडले नाही, गृहकर्जाचे थकवले हप्ते

लोकल ते ग्लोबल
Updated May 15, 2019 | 16:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतातील बँकांचे नऊ हजारकोटी रूपये बुडवलेल्या विजय मल्ल्यानं युरोपमधील बँकाही सोडलेल्या नाहीत. लंडनमधील घरासाठीच्या कर्जाचे हप्ते थकल्याने प्रकरण हायकोर्टात गेले होते. त्यात त्याला दिलासा मिळाला आहे.

Vijay Mallya file photo
विजय माल्या फाइल फोटो   |  फोटो सौजन्य: BCCL

लंडन : भारतातील बँकांचे नऊ हजार कोटी रूपये बुडवून लंडनला पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या अडचणी सतत वाढत आहेत. पण, त्यातही त्याला दिलासा देणारी एक गोष्ट घडली आहे. मल्ल्याला लंडनमध्ये एका आलिशान घरात राहण्यासाठी युरोपमधील एका बँकेनं दोन कोटी पाउंडचे कर्ज उपलब्ध करून दिले होते. पण, मल्ल्यानं हे कर्ज न भागवल्यानं बँकेनं त्याच्या मागे वसुलीचा तगादा लावला होता. प्रकरण कोर्टापर्यंत गेले.आता हे पैसे भागवण्यासाठी मल्ल्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मल्ल्याचा जीव तात्पुरता भांड्यात पडल्याचं मानलं जात आहे. सध्या भारताकडून मल्ल्याच्या प्रत्यापर्णासाठी प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयीन लढाईत त्या प्रयत्नांना यशही येऊ लागले आहे. त्यात मात्र मल्ल्याला दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचं मानलं जातं आहे.

उद्योगपती विजय मल्ल्या कायमच त्याच्या उच्चभ्रू राहणीमान आणि अय्याशीसाठी प्रसिद्ध आहे. यावरून त्याच्यावर अनेकदा टीकाही झाली आहे. भारतातील बँकांचे नऊ हजार कोटी रूपये बुडवलेल्या मल्ल्यानं युरोपमधील बँकाही सोडलेल्या नाहीत. लंडनमध्ये राहण्यासाठी जागा नसलेल्या विजय मल्ल्यानं उच्चभ्रू वस्तीतील एक घर निवडले होते. पण, त्यासाठी ही त्याला कर्ज काढावं लागलं. त्याने स्वित्झर्लंडमधील यूबीएस बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेनं त्याला कर्जही उपलब्ध करून दिले. बँकेने तब्बल २.०४ कोटी पाऊंडचे कर्ज उपलब्ध करून दिले. त्या पैशांच्या जोरावर मल्ल्या लंडनमध्ये राहत आहे. पण या कर्जाचे हप्तेही थकल्यानंतर मल्ल्याविरोधात बँकेनं नोटीस बजावली आणि प्रकरण कोर्टात गेलं. आता बँकेनं विजय मल्ल्याला कर्ज भरण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली आहे. पुढच्या एप्रिल महिन्यापर्यंत मल्ल्याला मुदत वाढवून देण्यात आली आहे.

ब्रिटनच्या उच्च न्यायालयाच्या चांसरी खंडपीठामध्ये माल्या आणि बँकेमध्ये खटला चालू होता. सोमवारी खंडपीठानं दिलेल्या आदेशानंतर बँक आणि मल्ल्या यांच्यात करार झाला. त्यामुळे पुढची सुनावणी खंडपीठानं रद्द केली. पण, न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानुसार जर, मल्ल्यानं पुढच्या म्हणजेच २०२०च्या ३० एप्रिलपर्यंत कर्ज भरले नाही तर, बँकेला मल्ल्याच्या घरावर ताबा घेता येणार आहे.

 भारतातही कारवाई

भारतात विजय मल्ल्यानं एसबीआयसह बड्या बँकांना एकूण ९ हजार कोटी रूपयांना बुडवले आहे. त्याच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. त्याची काही मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. तसेच त्याला लंडनमधून भारतात परत आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. लंडनमधील कोर्टानं मल्ल्याचे प्रत्यार्पण केल्यानंतर त्याला कोणत्या कारागृहात ठेवणार याची माहितीही मागवून घेतली आहे. भारताकडून ती देण्यातही आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी