अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आज आणणार भारतात, पुन्हा सेनेगलमध्ये अटक

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. स्थानिक यंत्रणांच्या मदतीने रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी आणि कर्नाटक पोलिसांच्या पथकानं रवी पुजारीला बेड्या ठोकल्या आहेत.

Ravi pujari
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आज आणणार भारतात, पुन्हा सेनेगलमध्ये अटक  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबईः अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. स्थानिक यंत्रणांच्या मदतीने रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी आणि कर्नाटक पोलिसांच्या पथकानं संयुक्तपणे केलेल्या कारवाईत रवी पुजारीला बेड्या ठोकण्यात आल्यात. सध्या अधिकारी त्यांच्या प्रत्यार्पणाची तयारी करत आहेत. आज संध्याकाळी किंवा उशिरा रात्री त्याला घेऊन पोलीस भारतात परततील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

रवी पुजारीला भारतात आणण्याचे सर्व कागदपत्रं पूर्ण झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आज रविवारी त्याला भारतात आणण्यात येईल. जेव्हा रवी पुजारीला भारतात आणलं जाईल तेव्हा तो कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. 

रवी पुजारीला 21 जानेवारी 2019 ला सेनेगलची राजधानी डकारमधील एका हेअर कटिंग सलूनधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर जून 2019 मध्ये तो फरार झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अँटोनी फर्नांडिसच्या नावानं पासपोर्ट बनवून सेनेगलमध्ये राहत होता. हा पासपोर्ट 10 जुलै 2013 रोजी जारी करण्यात आला होता, जो 8 जुलै 2023 पर्यंत वैध आहे.

रवी पुजारीच्या वतीने प्रत्यार्पणास आव्हान देणारी याचिका सेनेगलच्या सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. पण ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे रवी पुजारीला भारतात आणण्याचे मार्ग मोकळे झालेत. 

या नावानं राहत होता तिथे 

रवी पुजारी हा अँथोनी फर्नांडिस या नावाने राहत होता. पासपोर्टनुसार  तो एक व्यावसायिक एजंट होता. बुर्किना फासो या देशाचा पासपोर्ट त्याच्याकडे होता. रवी पुजारीचे आधी थायलंड, मलेशिया, मोरोक्को या देशांत बस्तान होते तर नंतर पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो, कोंगो रीपब्लिक, गिनी, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल या देशांत तो आतापर्यंत राहिला. गेल्या आठ वर्षांत पुजारीनं सेनेगल, बुर्किना फासो आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये  नमस्ते इंडिया नावाच्या रेस्टॉरंट्स चालवत असे. डकारमध्ये जवळपास गेल्या दशकभरापासून तो पत्नी, मुलांसह राहत होता. 

अनेक गुन्ह्यांची नोंद 

पुजारीवर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अन्य अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकात बेंगळुरूमध्ये 39, मंगळूरमध्ये 36, उडुपीमध्ये 11 तर म्हैसूर, हुबळी-धारवाड, कोलार आणि शिवमोगामध्ये प्रत्येकी एक गुन्हा पुजारीविरुद्ध दाखल आहे. तर महाराष्ट्र मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये त्याच्या विरूद्ध 49 गुन्ह्यांची नोंद आहे. गुजरातमध्ये खंडणी प्रकरणी त्याच्याविरूद्ध 75 गुन्हे नोंद आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी