रस्ता चुकलेल्या तरुणीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 14, 2019 | 09:23 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

18-Year-Old girl Raped: देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. आता एका १८ वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

girl raped auto-rickshaw driver hyderabad crime news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • १८ वर्षीय तरुणीवर बलात्कार
  • रिक्षाचालकाने तरुणीवर केला बलात्कार 
  • रस्ता चुकलेल्या तरुणीचा रिक्षाचालकाने घेतला गैरफायदा 

नवी दिल्ली: तेलंगणा येथील सायराबादमध्ये महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबाद येथे एका १८ वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणी आपल्या आजीकडे चालली होती आणि वाटेत रस्ता चुकल्याने तिने रिक्षाचालकाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र रिक्षाचालकाने या तरुणीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ वर्षीय पीडित तरुणी आपल्या १० वर्षांच्या लहान बहिणीसोबत आजीच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. ८ डिसेंबर रोजी रात्री त्या आजीकडे जात होत्या. मात्र, वाटेत त्या रस्ता चुकल्या. यावेळी पीडित तरुणीने रिक्षाचालकाची मदत घेत रिक्षात बसली. मात्र, रिक्षाचालकाने तिचा गैरफायदा घेत अज्ञातस्थळी नेलं. यानंतर १८ वर्षीय तरुणीवर कथितपणे बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. 

आरोपी रिक्षाचालकाने बलात्कार केल्यावर पीडित मुलीला दुसऱ्या दिवशी सकाळी फलकनुमा रेल्वे स्थानकाजवळ दोन्ही बहिणींना सोडलं आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या नातेवाईकांना फोन केला आणि त्यानंतर घर गाठलं. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आपला तपास सुरु केला आहे.

हैदराबादमध्ये आरोपींचा एन्काउंटर

एका डॉक्टर तरुणीवर गेल्या महिन्यात चार जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिला जाळून हत्या केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. सर्वत्र आंदोलन, निषेध मोर्चा काढण्यात आले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी चारही आरपींना अटक केली. यानंतर क्राईम सीनच्या रिक्रिएशसाठी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेलं असता आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आरोपींना आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र, आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चारही आरोपींचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी