अवघ्या दोनच दिवसांत 'गोडसे ज्ञानशाळा' प्रशासनाकडून बंद; लायब्ररी, पुस्तके जप्त

हिंदू महासभेने सुरू केलेली 'गोडसे ज्ञानशाळा' अवघ्या दोनच दिवसांत बंद करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील आपल्या कार्यालयात हिंदू महासभेने हे वाचनालय सुरू केलं होतं.

Godse gyanshala closed in just two days
अवघ्या दोनच दिवसांत 'गोडसे ज्ञानशाळा' प्रशासनाकडून बंद  |  फोटो सौजन्य: ANI

ग्वाल्हेर : हिंदू महासभे (Hindu Mahasabha)ने सुरू केलेली 'गोडसे ज्ञानशाळा' (Godse Gyaanshala, library) दोनच दिवसांत बंद करावी लागली आहे. हिंदू महासभेकडून रविवारी (१० जानेवारी २०२१) मध्यप्रदेशा (Madhya Pradesh)तील ग्वाल्हेर (Gwalior) शहरात 'गोडसे ज्ञानशाळा' नावाने एक वाचनालय सुरू केलं होतं. महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे (Nathuram Godse) याच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या वाचनालयावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. ग्वाल्हेर येथील स्थानिक जिल्हा प्रशासन, काँग्रेस सोबतच इतरही अनेक संघटनांनी यावर आक्षेपही घेतला होता.

हिंदू महासभेकडून ग्वाल्हेरमधील दौलतगंज येथील आपल्या कार्यालयात 'गोडसे ज्ञानशाळा' सुरू केली होती. यावरुन स्थानिक काँग्रेस नेत्यांनी हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्याची मागणीही केली होती. या संदर्भात माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच त्या परिसरात कलम १४४ लागू केला आणि कोणत्याही प्रकारे शांततेचा भंग होऊ नये अशा सूचनाही दिल्या. 

ग्वाल्हेरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, किशोर कान्याल यांनी सांगितले की, "माध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर दौलतगंजमध्ये ही ज्ञानशाळा सुरू झाल्याची माहिती मिळाली." यानंतर प्रशासनाने हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसही बजावली. 

तर स्थानिक प्रशासनासोबत चर्चा केल्यावर हिंदू महासभेने 'गोडसे ज्ञानशाळा' बंद केली आहे. यासंदर्भात हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयवीर भारद्वाज यांनी सांगितले की, "हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, हिंदू महासभा भवन दौलतगज ग्वाल्हेर येथे राष्ट्रप्रेम संदर्भातील प्रेरणास्त्रोतचे आयोजन सुरुच राहतील. गोडसे ज्ञानशाळा चालवण्यात येणार नाही."

रविवारी जयवीर भारद्वाज यांनी म्हटलं होतं की, गोडसे देशभक्त होते आणि असे अनेक देशभक्त होते ज्यांना योग्य स्थान मिळालेले नाहीये. या वाचनालयात संबंधित पुस्तके असतील ज्यामुळे गोडसे यांना प्रेरणा मिळाली जसे की, शीख धर्मगुरू. याशिवाय या ज्ञानशाळेत गुरु गोविंदसिंह, महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीही माहितीची पुस्तके असणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी