सोन्याच्या खाणीत चोरी करण्यासाठी गेले आणि परतलेच नाही

Gold mine: सोन्याच्या खाणीत सोनं चोरण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटक राज्यातील कोलार येथे ही घटना घडली आहे. 

gold mine kolar three people lost life
फोटो सौजन्य: iStockImages (प्रातिनिधीक फोटो)  

थोडं पण कामाचं

  • सोनं चोरण्यासाठी बिशप दोडी येथील पाच जण खाणीत गेले होते
  • पाच जणांपैकी तिघांचा झाला मृत्यू 
  • बचावलेल्या दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात 

बंगळुरू: एका बंद पडलेल्या सोन्याच्या खाणीत चोरी करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यात ही सोन्याची खाण आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेबाबत गुरूवारी पोलिसांनी सांगितले की, सोन्याच्या खाणीत चोरी करण्यासाठी एकूण पाच जण गेले होते.

एकूण पाच जण या सोन्याच्या खाणीत गेले होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण बचावले आहेत. मरिकुप्पम पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामदास यांनी सांगितले की, बचावलेलेल्या दोघांना आम्ही ताब्यात घेतले आहे. मृतकांमध्ये जोसेफ, कांडा आणि पडियप्पा यांचा समावेश आहे. त्यांचे इतर दोन सहकारी व्हिक्टर आणि कार्तिक हे असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. 

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, बिशप दोडी परिसरात राहणारे जोसेफ, कांडा, पडियप्पा, व्हिक्टर आणि कार्तिक हे पाच जण सोनं चोरण्यासाठी कोलार येथील बंद पडलेल्या सोन्याच्या खाणीत गेले होते. ही खाण बंगळुरू येथून जवळपास १०० किलोमीटर दूर आहे. 

रिपोर्ट्सनुसार, बुधवारी रात्री पाचही जण या सोन्याच्या खाणीत चोरी करण्याच्या उद्देशाने गेले. खाण बंद पडलेली होती आणि तेथे प्रचंड अंधारही होता. या अंधारात त्यांना काही व्यवस्थित दिसले नाही आणि ते तब्बल १००० फूट उंचीवरून खाली कोसळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूचे आणखी एक कारण म्हणजे खाणीमध्ये विषारी वायू होता, त्यामुळे त्यांना श्वासोच्छवास घेण्यास अडथळा निर्माण झाला असावा आणि मृत्यू झाला. 

या घटनेनंतर व्हिक्टर आणि कार्तिक यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर त्यांनी स्थानिक रहिवाशांना याची माहिती दिली. मग, याबाबत पोलिसांनाही कळवण्यात आले. घटनास्थळावर पोहोचून अग्निशमन दलाच्या मदतीने पोलिसांनी जोसेफ आणि कांडा यांचे मृतदेह बाहेर काढले तर पडियाप्पा याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाहीये. पोलिसांनी व्हिक्टर आणि कार्तिक यांना ताब्यात गेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

रिपोर्ट्सनुसार, कोलार गोल्ड माईनमधील सोन्याची सामग्री कमी झाल्यामुळे २००१ मध्ये ही खाण बंद करण्यात आली. जसजसे सोन्याचे भाव वाढत असतात तसतसे चोर हे सोन्याच्या शोधात या खाणीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी