Gold Covid Sample Seized : हैदराबाद विमानतळावर (Hyderabad Airport) सोन्याची तस्करी (Gold smuggling) करण्याचा विचित्र प्रयत्न कस्टम अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे फसला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Rajiv Gandhi International Airport) कस्टम अधिकाऱ्यांनी 1 कोटी 65 लाख रुपये किंमतीचं सोनं जप्त केलं. दुबईहून हे सोनं भारतात आणण्यात आलं होतं आणि विमानतळावरून छुप्या मार्गानं ते बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
दुबईहून आलेल्या AI - 952 या विमानाने भारतात आलेला एक प्रवासी कोविड टेस्ट करण्यासाठी कोविड सेंटरमध्ये गेला. या प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं होतं. विमानतळावरील कोविड टेस्टिंग सेंटरमधील एक कर्मचाऱ्याच्या हातात या प्रवाशाने कोविड सँपल म्हणून एक वस्तू दिली. प्रत्यक्षात ते कोविड सँपल नव्हतं तर एक डबीत लपवलेलं चोरीचं सोनं होतं.
या घडामोडींवर लक्ष ठेऊन असणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यांनी कोरोना टेस्टिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या खासगी कर्मचाऱ्याला गाठलं आणि त्याच्याकडील बाटली ताब्यात घेतली. सुरुवातीला सँपल देण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्याकडून कस्टम विभागाने ती बाटली मिळवली आणि तपासणी केली. त्या बाटलीत कोरोनाची टेस्ट करण्यासाठीचं सँपल नसून सोनं लपवल्याचं अधिकाऱ्यांना दिसून आलं. त्यानंतर कोविड कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे. अशा प्रकारे कोविड सेंटरमधील खासगी कर्मचाऱ्याला तस्करीच्या प्रकरणात अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आरटीपीसीआर टेस्टच्या नावाखाली देण्यात आलेलं 3 किलो 14 ग्रॅम सोनं कस्टम विभागानं पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतलं आहे.
अशा प्रकारे विमानतळावरून सोन्याची तस्करी करण्याचा हा आठवड्यातला दुसरा प्रकार आहे. 25 मे रोजी कस्टम विभागनं तस्करी करण्यासाठी आलेलं 723.39 ग्रॅम सोनं जप्त केलं होतं. दुबईहून आलेल्या एका महिला प्रवाशाकडून हे सोनं जप्त करण्यात आलं होतं.
आतापर्यंत भारतात सोन्याची तस्करी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या आणि कल्पक मार्गांचा वापर तस्करांकडून केला जात असल्याचं दिसून आलं आहे. मात्र कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रसंगावधान राखत हे प्रयत्न हाणून पाडले आहेत. बुटात सोनं लपवणे, सोन्याचे दात बसवणे, सोनं खाणे, पार्श्वभागात सोने लपवून आणणे, सोने वितळवून त्याचे कपडे करून घालणे यासारख्या अनेक मार्गांनी आतापर्यंत तस्करीचे प्रयत्न झाले आहेत.