Google Bhikari: गुगलवर भिकारी टाईप केल्यास दिसतो एका देशाचा पंतप्रधान

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 20, 2019 | 10:46 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Google Bhikari: सध्या गुगलवर भिकारी असे टाईप केल्यास पाक पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो दिसत आहे. पाकिस्तान सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर इमरान खान यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

Pakistan PM Imran Khan
पाक पंतप्रधान इमरान खान सोशल मीडियावर ट्रोल   |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला; महागाईने गाठला कळस
  • पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान सोशल मीडियावर होत आहेत ट्रोल
  • पाकिस्तानची जागतिक पातळीवरही आर्थिक कोंडी, अमेरिकेचा मदतीस नकार

नवी दिल्ली : डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारीने गाठलेला कळस, दहशतवाद्यांना आश्रय दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली बदनामी, अशा परिस्थितीत असलेला शेजारी देश पाकिस्तान सध्या वेगळ्याच संकटातून जात आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी या देशापुढे पर्यायही दिसत नाही. मध्यंतरी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी अमेरिकेचा दौरा केला. त्यात त्यांनी अमेरिकेकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. पण, अमेरिकेने अद्याप मदतीचे आश्वासन दिलेले नाही. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं आव्हान सध्या पंतप्रधान इमरान खान यांच्या समोर आहे. सध्या गुगलवर भिकारी असे टाईप केल्यास पाक पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो दिसत आहे. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवरून सोशल मीडियावर इमरान खान यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. त्यामुळेच गुगलवर भिकारी म्हणून इमरान खान यांचे फोटो दिसू लागले आहेत.

 

 

पाकिस्तानची चारही बाजूंनी कोंडी

अनेक फोटोंमध्ये पाक पंतप्रधान इमरान खान हातात कटोरा घेतलेले दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इंग्रजी किंवा हिंदी कोणत्याही भाषेत भिकारी टाईप केले तरी, इमरान खान यांचेच फोटो दिसत आहेत. मुळात भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. पाकिस्तानने चीनच्या मदतीने संयुक्त राष्ट्रांमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. पण, त्यातही पाकिस्तान तोंडावर आपटला आहे. पाकिस्तानने भारताशी सर्व आर्थिक आणि राजनैतिक व्यवहार संपुष्टात आणले आहेत. पंजाबमधून होणारा व्यापार सध्या बंद करण्यात आला आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होत असून, तेथे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. पाकिस्तानात टोमॅटो ३०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. सध्या पाकिस्तानात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पेट्रोल ९५.२४ तर डिझेल ११२.२४ रुपये दराने विकले जात होते. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात पेट्रोल ११७.८३ तर, डिझेल १३२.४७ रुपये लिटर दराने विकले जात आहे.

 

 

महागाई शिखरावर; जगणं झालं मुश्कील

जागतिक पातळीवरही पाकिस्तानची अवस्था खूपच वाईट आहे. पाकिस्तानी रुपयाचा डॉलरच्या तुलनेत दर १५८ रुपये झाला आहे. गेल्या वर्षी हा दर १२३ रुपये होता. दिवसेंदिवस पाकिस्तानी रुपयाची किंमत घसरत आहे. बाजारात चपाती आणि नानची किंमत ८ रुपयांवरून १२ रुपये झाली आहे. साखर ६५ रुपये किलो होती ती आता ७५ ते ७८ रुपये किलो दराने विकली जात आहे. सीएनजी गॅस ८१.७० रुपयांवरून १२३ रुपये किलो झाला आहे. पाकिस्तानात खाद्य तेल सध्या १८० रुपयांवरून २२० रुपये प्रति किलो झाले आहे. मूग, मसूर आणि इतर कडधान्ये ९० ते १०० रुपये किलो दराने विकली जात होती. त्याची किंमत आता १४०-१६० रुपये झाली आहे. तर, ९४ रुपये लिटर मिळणारे दूध आता १०० ते १२० रुपये लिटर दराने विकले जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...