हैदराबादमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या भाजपची पहिल्या क्रमांकासाठी धडपड

हैदराबाद महानगरपालिकेच्या १५० वॉर्डसाठी मंगळवारी १ डिसेंबर रोजी मतदान, मतमोजणी शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी होणार

Greater Hyderabad Municipal Corporation polls a litmus test
हैदराबादमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या भाजपची पहिल्या क्रमांकासाठी धडपड 

थोडं पण कामाचं

  • हैदराबादमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या भाजपची पहिल्या क्रमांकासाठी धडपड
  • हैदराबाद महानगरपालिकेसाठी मंगळवारी १ डिसेंबर रोजी मतदान, मनपाच्या १५० वॉर्डसाठी निवडणूक
  • मतमोजणी शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी होणार

हैदराबाद: हैदराबाद महानगरपालिकेसाठी (Greater Hyderabad Municipal Corporation - GHMC) मंगळवारी १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मनपाच्या १५० वॉर्डसाठी निवडणूक होणार आहे. मतमोजणी शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी होणार आहे. भाजपने भविष्यात तेलंगाणाच्या विधानसभेत मोठी भूमिका बजावण्याची तयारी म्हणून हैदराबाद पालिकेची निवडणूक गंभीरपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Greater Hyderabad Municipal Corporation polls a litmus test)

हैदराबाद मनपामध्ये लोकसभेचे पाच तर विधानसभेचे २४ मतदारसंघ आहेत. या पालिकेवर वर्चस्व मिळवले तर भविष्यात तेलंगाणाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी भाजपला मिळू शकेल. याच कारणामुळे दक्षिण भारतात फक्त कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या भाजपने हैदराबाद पालिकेची निवडणूक गंभीरपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister) अमित शहा (Amit Shah) यांनी २१ नोव्हेंबर रोजी तामीळनाडूचा (Tamil Nadu) दौरा केला. भाजपने (Bharatiya Janata Party - BJP) पुढच्या वर्षी असलेल्या तामीळनाडू विधानसभेच्या निवडणुका (Assembly Elections) डोळ्यापुढे ठेवून तयारी सुरू केली आहे. तामीळनाडूच्या दौऱ्यानंतर अमित शहा यांच्यासह भाजपने हैदराबादवर लक्ष केंद्रीत केले.

तेलंगाणात सत्तेत असलेल्या तेलंगाणा राष्ट्र समितीच्या (Telangana Rashtra Samithi - TRS) ताब्यात हैदराबाद मनपा आहे. पालिकेत एमआयएम (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen - AIMIM or MIM) दुसऱ्या क्रमांकाचा तर भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. हैदराबाद मनपासाठी २०१६मध्ये झालेल्या निवडणुकीत टीआरएस ९९ तर एमआयएम ४४ जागांवर विजयी झाली होती. भाजपला फक्त ४ जागांवर विजय मिळाला होता. पण यंदाच्या निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच कमालीच्या आक्रमकतेने निवडणूक लढवताना दिसला. भाजपच्या आक्रमकतेमुळे हैदराबादच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी तसेच कर्नाटकमधील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी हैदराबादमध्ये जोरदार प्रचार केला. भाजपच्या रोड शो कार्यक्रमांमुळे निवडणुकीत रंगत आली. टीआरएसने भाजपचे नाव न घेता परप्रांतीय घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. एमआयएम आणि भाजप यांच्यात तर अनेकदा शाब्दिक युद्ध रंगले. यामुळे निवडणूक कोण जिंकणार याविषयी उत्सुकता वाढली आहे.

टीआरएससमोर आव्हान

हैदराबाद मनपातील सत्ता राखणे हे टीआरएस समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. एमआयएम या पक्षाचे मूळ हैदराबादमध्येच आहे. पण भाजपच्या निमित्ताने टीआरएसला थेट राष्ट्रीय पक्षाकडून आव्हान मिळाले आहे. आधी काँग्रेसला यशस्वी टक्कर देणाऱ्या टीआरएसला भाजपसमोर टिकाव धरण्यात किती यश मिळते हे निवडणूक निकालातून स्पष्ट होईल. कोरोना, पूर आणि बेरोजगारीचे संकट हाताळण्यावरुन मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका टीआरएसला बसू शकतो. सत्तेत असण्याचे हे मोठे नुकसान त्यांना सोसावे लागणार की चांगल्या प्रतिमेच्या जोरावर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव पक्षाला पुन्हा तारणार हे शुक्रवारी मतमोजणीनंतर लक्षात येईल.

एमआयएमसमोर कामगिरी सुधारण्याचे आव्हान

एमआयएम या पक्षाने ४४ जागा जिंकून २०१६च्या निवडणुकीत दुसऱ्या स्थानाचा मान मिळवला. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी टीआरएस आणि तिसऱ्या क्रमांकाचा भाजप यांच्या आक्रमक प्रचाराला टक्कर देणाऱ्या एमआयएमला कामगिरी सुधारण्यात किती यश मिळते हे निवडणुकीच्या निकालातून समजेल.

भाजपची गाडी ४ वरुन पुढे सरकणार?

हैदराबाद मनपासाठी झालेल्या मागील दोन्ही निवडणुकांमध्ये (२०१६ आणि २००९) भाजपला फक्त ४ जागा जिंकता आल्या होत्या. यंदा भाजपने आक्रमक प्रचार केला आहे. भाजपच्या या शक्तीप्रदर्शनाला मतदार कसा प्रतिसाद देतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेससमोर आव्हान

तेलंगाणामध्ये सातत्याने मोठ्या अपयशाचा सामना करत असलेल्या काँग्रेससाठी हैदराबादची निवडणूक ही शहरातले स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे. या लढाईत किती यश मिळते हे निवडणूक निकालातून जाहीर होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी