Varun Singh News : बेंगळुरू : तमिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात वाचलेले एकमेव व्यक्ती कॅप्टन वरुण सिंह यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. ८ डिसेंबर रोजी तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. त्यात सीडीएस बिपीन रावत त्यांची पत्नी मधुलिका आणि इतर ११ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात ग्रूप कॅप्टन वरुण सिंह एकमेव वाचले होते. परंतु आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय हवाई दलाने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
group captain varun singh no more was injured in tamil nadu chopper accident
भारतीय हवाई दलाने ट्विटरवरून माहिती दिली आहे की आम्हाला सांगताना अतिशय दुःख होत आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले आहे. ८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या अपघातात ते एकटे वाचले होते. हवाई दल त्यांच्या निधनाबद्दल संवेदना व्यक्त करत असून त्यांच्या कुटुंबीयांसोबत उभे आहे असे हवाई दलाने म्हटले आहे.
IAF is deeply saddened to inform the passing away of braveheart Group Captain Varun Singh, who succumbed this morning to the injuries sustained in the helicopter accident on 08 Dec 21. IAF offers sincere condolences and stands firmly with the bereaved family. — Indian Air Force (@IAF_MCC) December 15, 2021
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह मूळचे उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्याचे रहिवासी होते. बेंगळूरुच्या सैन्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वरुण सिंह हे अभिनंदन वर्धमान यांचे बॅचमेट होते. अभिनंदन वर्धमान यांनीच २७ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय सीमेत घुसलेल्या विमानाला हुसकावून लावले होते.
कॅप्टन वरुण सिंह यांचा जन्म दिल्लीत झाला होता. सिंह यांचे वडील कृष्ण प्रताप सिंह सैन्यातून कर्नल पदावरून निवृत्त झाले होते. वरुण सिंह यांचे छोटे बंधू नौदलात कार्यरत आहेत. वरुण सिंह यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरुण सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. वरुण सिंह यांनी देशाच्या समृद्धीसाठी जे योगदान दिले आहे ते कधी विसरले जाणार नाही असे मोदी म्हणाले आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत माहिती दिली होती की ८ डिसेंबर रोजी दुपारी तमिळनाडूच्या कन्नूर भागात हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि १२ जण उपस्थित होते. हवाई दलाच्या एमआय १८ हेलिकॉप्टारने सुलूर एअरबेसवरून सकाळी ११.४८ वाजता उड्डाण केले. १२.१५ वाजता वेलिंग्टन येथे हे हेलिकॉप्टर लँड होणे अपेक्षिते होते. परंतु १२.०८ वाजता हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातात सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल एस लिड्डर, कर्नल हरजिंदर सिंह, लान्स नायक विवेक कुमार, नायक गुरुसेवक सिंह, लान्स नायक बी साई तेजा, नायक जितेंद्र कुमार, हवालदार सतपाल राय, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वॉड्रन लीडार कुलदीप सिंह, राणा प्रताप दास, जेडब्ल्युओ प्रदीप यांचे त्याच दिवशी निधन झाले होते. या अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंह वाचले होते. आज उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.