एप्रिलमध्ये १.४१ लाख कोटींचे उच्चांकी, जीएसटी करसंकलन

लोकल ते ग्लोबल
Updated May 02, 2021 | 16:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

एप्रिल महिन्यात विक्रमी १.४१ लाख कोटी रुपयांचे जीएसटी करसंकलन. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात जीएसटी करसंकलनात १४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Record break GST collection in April
एप्रिलमध्ये विक्रमी जीएसटी करसंकलन 

थोडं पण कामाचं

  • विक्रमी जीएसटी करसंकलन
  • १.४१ लाख कोटींची जीएसटी महसूल
  • जीएसटीची वाढती कमान

नवी दिल्ली : एप्रिल महिन्यात विक्रमी १.४१ लाख कोटी रुपयांचे जीएसटी करसंकलन झाल्याची माहिती अर्थमंत्रालयाने दिली आहे. हे उच्चांकी जीएसटी करसंकलन देशाती अर्थव्यवस्था रुळावर असल्याचेच निदर्शक आहे, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात जीएसटी करसंकलनात १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्चमध्ये १.२३ लाख रुपयांचे करसंकलन झाले होते.

एप्रिलमध्ये नोंदवली १४ टक्क्यांची वाढ

एप्रिल महिन्यात देशांतर्गत व्यवहारांमुळे झालेल्या महसूलात वाढ झाली आहे. यामध्ये आयातशुल्काचाही समावेश आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमधील महसूलात २१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

सांघिक कामगिरी

जीएसटी करसंकलनाने फक्त सलग सातव्या महिन्यात एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला नाही तर सतत वाढ नोंदवली आहे. या कालावधीमध्ये देशाची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असल्याचेच हे निदर्शक आहे. करचोरी, कराशी निगडीत विविध माहितीचे संकलन, जीएसटी, प्राप्तिकर विभाग आणि कस्टम्सचा आयटी विभाग आणि प्रभावी कर व्यवस्थापन यांच्या संयुक्त कामगिरीमुळे हे शक्य झाले असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

एप्रिलमध्ये विक्रमी महसूल

एप्रिल २०२१मध्ये जीएसटी करसंकलनातून विक्रमी १,४१,३८४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये सीजीएसटी २७,८३७ कोटी रुपये, एसजीएसटी ३५,६२१ कोटी रुपये, आयजीएसटी ६८,४८१ कोटी रुपये आणि  ९,४४५ कोटी रुपयांच्या सेसचा समावेश आहे. कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले असताना भारतीय उद्योग आणि व्यापाऱ्यांनी फक्त जीएसटी विवरण पत्राशी निगडीत नियमांचे पालन केलेले नाही तर वेळेवर जीएसटी करदेखील भरला आहे, असेही पुढे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांत निर्बंधांसह लॉकडाऊनसुद्धा लागू झाले आहे. याचा विपरित परिणाम उद्योग धंद्यांवर होतो आहे. मात्र असे असतानाही जीएसटी करसंकलनाने उच्चांकी नोंदवली आहे. उद्योग आणि व्यापारातून मिळवला जाणारा नफा किंवा महसूल जितका अधिक तितकाच जीएसटी करसंकलनातून मिळणारा महसूलदेखील अधिक असतो. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात देखील देशातील उद्योग आणि व्यापार या जिद्दीने परिस्थितीवर मात करत असल्याचे चित्र आहे. त्यातच मागील सलग सात महिन्यांपासून जीएसटी कर संकलनाने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक महिन्यात जीएसटी करसंकलनात आधीच्या महिन्याच्या तुलनेत वाढ होते आहे. देशाची अर्थव्यवस्था रुळावर असल्याचेच हे चित्र असल्याचे मत त्यामुळे अर्थमंत्रालयाने व्यक्त केले आहे.
 

कोरोनाच्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. अर्थव्यवस्थेला यातून सावरण्यासाठी सरकारने वेळोवेळी विविध योजना जाहीर केल्या आहेत. याशिवाय सरकार विविध पावले यासंदर्भात उचलत आहेत. विविध क्षेत्रांना चालना देण्यासाठी सरकारने खास पावले उचलली आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करणारे क्षेत्र, रोजगार निर्माण करणारे क्षेत्र, अर्थव्यवस्थेत योगदान देणारी महत्त्वाची क्षेत्रे यांना सरकार विशेष प्रोत्साहन देते आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसमोरदेखील कोरोनामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी