काळजी करू नका, पॅन-आधार लिंक करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 23, 2020 | 16:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

३१ मार्च २०२० पर्यंत आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत सरकारने दिली होती. मात्र, याबाबत गुजरात उच्च न्यायालयाने अजूनही पॅन-आधार लिंक न केलेल्यांसाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय दिला आहे.

Gujarat HC says government can invalidate pan for lack of aadhar linkage
काळजी करू नका, पॅन-आधार लिंक करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • ३१ मार्च २०२० पर्यंत आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत सरकारने दिली होती.
  • गुजरात उच्च न्यायालयाने अजूनही पॅन-आधार लिंक न केलेल्यांसाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय दिला आहे.
  • आधारकार्डशी लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द करता येणार नसल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

गुजरात: केंद्र सरकारने आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणे अनिवार्य असल्याचे याआधीच सांगितले आहे. यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही बऱ्याच लोकांचे हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ३१ मार्च २०२० पर्यंत आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत सरकारने दिली होती. मात्र, याबाबत गुजरात उच्च न्यायालयाने अजूनही पॅन-आधार लिंक न केलेल्यांसाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय दिला आहे. आधारकार्डशी लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द करता येणार नसल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

एखाद्या व्यक्तीने आपले पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केले नसेल तरीही त्याला आयकर परतावा भरण्यापासून किंवा व्यवहार करण्यापासून रोखता येऊ शकत नाही असो न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत आधार अॅक्टच्या वैधतेबाबत निर्णय देत नाही तोपर्यंत सरकार कोणत्याही व्यक्तीचे पॅन कार्ड अवैध किंवा रद्द करू शकत नाही. तसेच त्या व्यक्तीला डिफॉल्टर घोषितही करता येऊ शकत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गुजरात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

आधार-पॅन लिंक कसे करायचे?

सर्वप्रथम आयकर विभागाच्या संकेतस्थळावर डाव्या बाजूला ‘link adhaar’ या पर्यायावर क्लिक करा. मात्र त्याआधी आयकर विभागाच्या संकेतस्थळावर तुमचे लॉग इन आयडी असणे गरजेचे आहे.

‘link adhaar’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला पॅन नंबर, आधारकार्ड नंबर, आधार कार्डवरील नाव अशी सर्व माहिती भरावी लागेल.

ही माहिती भरतेवेळी तुम्हाला ‘I have only year of birth in adhaar card’ असा पर्याय दिसेल. तुमच्या आधार कार्डवर तुम्ही केवळ जन्मवर्ष भरले असेल तर या पर्यायावर मार्क करा.

ही माहिती भरून झाल्यावर खाली एक captcha code दिलेला असेल, तो व्यवस्थित न चुकता जसाच्या तसा भरा.

ही माहिती पूर्ण भरून झाल्यावर खाली ‘link adhaar’चा पर्याय दिलेला असेल त्यावर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमचे आधार-पॅन लिंक होणार आहे.

संकेतस्थळावरील ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही खात्री करण्यासाठी ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर एसएमएस पाठवून आधार-पॅन लिंक झाल्याची माहिती मिळवू शकता. याव्यतिरिक्त UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> एसा एसएमएस वर दिलेल्या क्रमांकावर पाठवा. या दोन्ही प्रकारे तुम्ही आधार-पॅन लिंक झाल्याबद्दलची माहिती मिळवू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी