Congress on Modi: काँग्रेसने मोदींना दिलेली उपमा ऐकून भाजपचा संताप, ‘या’ वाक्यावर घेतला जोरदार आक्षेप

गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींचा चेहरा वापरून मते मागण्याच्या भाजपच्या प्रकारावर खरगे यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर भाजप मतं मागतो. मोदींना असे चेहरे आहेत तरी किती, असा सवाल करत खरगे यांनी त्यांची तुलना रावणाशी केली.

Congress on Modi
काँग्रेसने मोदींना दिलेली उपमा ऐकून भाजपचा संताप  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका
  • प्रत्येक निवडणुकीत मोदींचा चेहरा वापऱण्यावरून जोरदार टीका
  • खरगे यांच्या टीकेनंतर भाजप झाली आक्रमक

Congress on Modi: गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान (Gujrat assembly elections) काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केलेल्या टीकनंतर आता भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींचा चेहरा वापरून मते मागण्याच्या भाजपच्या प्रकारावर खरगे यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर भाजप मतं मागतो. मोदींना असे चेहरे आहेत तरी किती, असा सवाल करत खरगे यांनी त्यांची तुलना रावणाशी केली होती. त्याला आता भाजपने आक्षेप घेतला असून खरगेंनी गुजरातच्या सुपुत्राचा अपमान केल्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या या अगोचरपणाला जनताच धडा शिकवेल, असा विश्वासही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

काय म्हणाले खरगे?

गुजरातमध्ये प्रचारसभेत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा वापऱण्यावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले, “त्यांना स्वतःशिवाय दुसरं कुणी दिसतच नाही. सतत ते स्वतःचीच टिमकी वाजवत राहतात. त्यांना सांगायचं असतं की तुम्ही इतर कुणाकडे पाहूदेखील नका. फक्त माझ्याकडेच पाहा. माझाच चेहरा पाहा. आता तुमचा चेहरा किती वेळा बघणार. पालिका निवडणुकीतही तुमचाच चेहरा पाहा, विधानसभा निवडणुकीतही तुमचाच चेहरा पाहा, लोकसभा निवडणुकीतही तुमचाच चेहरा पाहा. प्रत्येक ठिकाणी तुमचाच चेहरा. तुम्हाला असे चेहरे आहेत तरी किती? रावणासारखी तुम्हालाही 100 तोंडं आहेत की काय?” खरगेंनी केलेल्या या विधानानंतर सूरतमधील भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी एका सुरात खरगे यांचा निषेध करायला सुरुवात केली आहे. 

अधिक वाचा - तत्काळ तिकिटाच्या रांगेत घुसखोरी केल्यावरून राडा, झाला गोळीबार

गुजरातमध्ये अटीतटीची लढाई

गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपला सत्ता टिकवता येणार की सत्तापरिवर्तन होणार, याची सध्या जोरदार चर्चा आहे. गेल्या काही निवडणुकांइतकी ही निवडणूक भाजपला सोपी जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपसोबत आपनेही या निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावली आहे. गुजरातमध्ये काँग्रेसपेक्षाही आपने भाजपसमोर आव्हान निर्माण केल्याचं चित्र आहे. त्यामुळे यंदा गुजरातची लढाई अटीतटीची असेल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तवला जात आहे. 

अधिक वाचा - श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती, वडिलांची हत्या करून तुकडे फ्रीजमध्ये ठेवले, आई आणि मुलाला अटक

वादग्रस्त विधानांचा इतिहास

भारतात निवडणूक आणि वादग्रस्त विधाने यांचा सिलसिला जुना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांवर अश्लाघ्य भाषेत टीका होत असल्याचंही दिसून आलं आहे. भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कधी ना कधी हे प्रकार केले आहेत. कधी बोलण्याच्या ओघात चुकून तर कधी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह आणि भडकाऊ विधानं केली जातात. मात्र सध्या खरगेंनी केलेलं हे विधान भाजपला चांगलंच झोंबलं असून त्यावर भाजपकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर देण्यात येतं, याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी