अहमदाबाद : काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. पुष्पा व्ही. गनेडीवाला यांनी अल्पवयीन मुलीच्या कपड्यावरून तीच्या स्तनांना स्पर्श करणे हे पॉक्सो कायद्याअंतर्गत लैंगिक शोषण नाही, असा अजब निकाल दिला होता. त्यांच्या या निर्णयावर खूप टीका झाली. न्यायाधिशांच्या या निर्णयावर नाराज होऊन गुजरातच्या देवश्री त्रिवेदी या महिलेने त्यांना १५० कंडोम पाठवले आहेत.
देवश्री यांनी वेग-वेगळ्या बारा ठिकाणी कंडोम पाठवले आहेत. याशिवाय, त्यांनी नागपूर खंडपीठाच्या रजिस्ट्रीतही कंडोम पाठवले आहेत. इंडिया टुडेशी बोलताना देवश्री म्हणाल्या की, त्या अशाप्रकारचा अन्याय सहन करणार नाहीत. न्यायमूर्ती गनेडीवाला यांच्यामुळे एका अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला नाही. देवश्री यांनी न्या.गनेडीवाला यांना पदच्यूत करण्याची मागणी केली आहे.
मागील नऊ फेब्रुवारीला कंडोम पाठवले असल्याचे देवश्री यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘एक महिला म्हणून मी काही चुकीचे केले आहे, असे मला वाटत नाही. मला याचा कसलाच पश्चाताप नाही. स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी झगडायला हवे. न्या. गनेडीवालाच्या या निर्णयामुळे लैंगिक शोषण करणाऱ्या पुरूषांना शिक्षा होणार नाही.
देवश्री यांना आपल्या या वर्तणुकीसाठी शिक्षाही केली जाऊ शकते. नागपूर खंडपीठाच्या रजिस्ट्री ऑफिसने त्यांना कंडोम मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, नागपूर बार असोसियेशनचे ज्येष्ठ वकिल श्रीरंग भांडारकर म्हणाले की, हा मानहानीचा मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.