भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या अब्दुल रहमान मक्कीला अटक, पाकिस्तान सरकारची कारवाई

लोकल ते ग्लोबल
Updated May 15, 2019 | 18:13 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

पाकिस्तानच्या ‘फलाह-ए-इंसानियत’ फाऊंडेशनचा (एफआयएफ) प्रभारी अब्दुल रहमान मक्कीला अटक करण्यात आली आहे. मक्की दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदचा नातेवाईक आहे.

Abdul Rehman Makki
दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला अटक 

लाहोर : मुंबईवरील दहशवादी हल्ल्याचा मास्टर माईंड आणि ‘जमात-उद-दावा’चा नेता हाफिज सईदचा जवळचा नातेवाईक असलेल्या अब्दुल रहेमान मक्कीला अटक करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्य आणि पाकिस्तान सरकारवर टीका केल्याच्या आरोपावर मक्कीला अटक केली गेली. 'जिओ न्यूज'नं गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगितलं की, ‘जमात-उद-दावा’ची राजकारणातील आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणातील देखरेख करणाऱ्या शाखेचा प्रमुख आणि जमातच्या चॅरिटी संस्था ‘फलाह-ए-इंसानियत’ फाऊंडेशन (FIF) चा प्रभारी असलेल्या मक्कीला या संघटनेविरोधात केल्या जात असलेल्या कारवाई अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

पंजाब पोलिसांनी या प्रकरणी माहिती देत म्हटलं, मक्कीला कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियमांर्तगत अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारनं जमात सोबतच FIF वर मार्च महिन्यातच बंदी घातलेली आहे. जमात-उद-दावा बद्दल सांगितलं जातं की, ही संस्था ‘लष्कर-ए-तोयबा’च्याच एक भाग आहे. ही संघटना मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार आहे. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता.

‘जमात-उद-दावा’ या संघटनेत मक्कीचा विशेष प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. तर मक्की भारताविरोधात गरळ ओकण्यासाठीही ओळखला जातो. २०१० मध्ये भारताविरोधी वक्तव्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता. मक्कीनं पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटच्या आठ दिवसांपूर्वी मुजफ्फराबादमध्ये भाषण दिलं होतं. यात त्यानं पुण्यासह भारतातील तीन शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली होती. भारताच्या मागणीनंतर अमेरिकेनं मक्कीला दहशतवादी म्हणून घोषित केलं.

दहशतवादी संघटनेमध्ये मक्की ‘जमात-उद-दावा’च्या प्रमुख व्यक्तींपैकी एक आहे. मक्कीवर आपल्या द्वेषानं भरलेल्या भाषणाचा आणि पाकिस्तान सरकार एफएटीएफ गाईडलाईन्सवर टीका केल्याचा आरोप आहे. मक्की तालिबान दहशतवादी संघटनेचा प्रमुख मुल्ला उमर आणि अल-कायदा दशहतवादी संघटनेचा प्रमुख अल-जवाहिरीचाही जवळचा मानला जातो.

अब्दुल रहमान मक्कीनं एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत काश्मीरच्या स्वातंत्र्याबद्दल वक्तव्य करतांना दिसला आहे. भारताविरोधात नेहमी गरळ ओकणाऱ्या मक्कीवर जवळपास १३ कोटी रुपयांचं (२० लाख डॉलर) बक्षिस आहे.

नुकतीच पाकिस्तानात ११ संघटनांवर बंदी घातली गेली आहे, ज्यांचा बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांसोबत संपर्क आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खाननं यांनी म्हटलं होतं की, ते कोणत्याही संघटनेला इतर देशांवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानच्या जमिनीचा वापर करू देणार नाही. पाकिस्तानात फलाह-ए-इंसानियत आणि जमात-उद-दावा या संघटनांवरही बंदी घातली गेली आहे. तसंच नुकतंच पाकिस्तान सरकारनं घोषणा केली की ३० हजारांहून अधिक मदरशांवर आता सरकारचं नियंत्रण असेल.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी