केरळमध्ये पावसाचा हाहाःकार; आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

दक्षिण आणि मध्य केरळला शनिवारी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. पावसामुळे आलेला पूर आणि दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

Hailstorm of rains in Kerala
केरळमध्ये पावसाचा हाहाःकार;   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • केरळच्या पाच जिल्ह्यांत दोन दिवस रेड अलर्ट तर सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता केरळ किनारपट्टीवर पोहोचले आहे. त्यामुळे केरळात पावसाचा जोर वाढला आहे.
  • रविवारी आणि सोमवारी संपूर्ण केरळ राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

कोट्टायम​ :  दक्षिण आणि मध्य केरळला शनिवारी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. पावसामुळे आलेला पूर आणि दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. परतीच्या पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. भूस्खलनामुळे अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केरळच्या पाच जिल्ह्यांत दोन दिवस रेड अलर्ट तर सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील गंभीर पूरस्थिती पाहता केरळच्या मुख्यमंत्र्यांनी लष्कराला पाचारण करण्याची विनंती केली असून अनेक भागांत लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता केरळ किनारपट्टीवर पोहोचले आहे. त्यामुळे केरळात पावसाचा जोर वाढला आहे. सध्या दक्षिण आणि मध्य केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्रिवेंद्रम, कोल्लम, पदानमटिट्टा, कोट्टायम, इडुक्की जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोट्टायम जिल्ह्यातच आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला असून 13 जण अद्याप बेपत्ता आहेत.


केरळात पुरामुळे परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. रविवारी आणि सोमवारी संपूर्ण केरळ राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अनेक भागांत मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. लष्कराची एक तुकडी कोट्टायममध्ये तैनात आहे. तर दुसरी तुकडी त्रिवेंद्रममध्ये तैनात आहे. एनडीआरएफची 7 पथकांनीही मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. एअर फोर्सलाही मदत कार्यासाठी तयार राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 


दरम्यान केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिर आजपासून 21 ऑक्टोबरपर्यंत भक्तांसाठी खुले होणार आहे. अयप्पा देवाच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भक्त मंदिरात येऊ शकतात. त्यात पुरस्थिती निर्माण झाल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे.

कोट्टयम, इडुकी आणि पथनमथिट्टा जिल्ह्यांतील डोंगर परिसरांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी 2018 आणि 2019 मध्येही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 2018 मध्ये आलेल्या पुरामुळं केरळात मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. त्यावेळी जवळपास 450 हून अधिक लोकांनी जीव गमावला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजयन यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत, पूरस्थितीचा सामना करण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी