नव्या वर्षात बदलणार या '७' गोष्टी, तुमच्या दैनंदिन व्यवहारात होणार बदल 

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 31, 2019 | 19:26 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

२०२० या नव्या वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नियमांच्या बदलामुळे तुमच्या दैनंदिन कार्यात बदल होणार आहेत. यामध्ये एटीएममधून पैसे काढण्यापासून जीएसटी नियमांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. जाणून घ्या

happy new year 2020 these rules change your life atm money withrawal pf rules gst 1 january marathi news
नव्या वर्षात बदलणार या '७' गोष्टी, तुमच्या दैनंदिन व्यवहारात होणार बदल (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

 • १ जानेवारी २०२० पासून काही नियमांत होणार बदल 
 • एटीएममधून पैसे काढण्यापासून जीएसटी नियमांपर्यंत होणार बदल 
 • या बदलांमुळे तुमच्या आयुष्यातील व्यवहारात होणार बदल 

नवी दिल्ली: १ जानेवारी २०२० रोजी केवळ नवं वर्ष सुरु होणार नाहीये तर तमच्या दैनंदिन व्यवहाराशी संबंधीत अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. यापैकी काही गोष्टी या पैशांशी संबंधित आहेत. जाणून घेवूयात १ जानेवारी २०२० पासून कोणत्या गोष्टींमध्ये बदल होणार आहेत आणि त्याचा काय परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. 

 1. PF नियमांत होणार बदल 
  नव्या वर्षात ईपीएफओच्या नियमांत अनेक बदल होणार आहेत. म्हणजेच १ जानेवारी २०२० पासून हे नवे नियम लागू होणार आहेत. आतापर्यंत पीएफ अशाच कंपन्यांना लागू होत होता ज्या कंपनीत २० पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. मात्र, केंद्र सरकारने आता कर्मचाऱ्यांची संख्या कमी करुन १० केली आहे. म्हणजेच ज्या कंपनीत १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी काम करतात ती कंपनी ईपीएफओच्या अखत्यारित येणार आहे. 

 2. कार खरेदी महागणार 
  १ जानेवारी २०२० पासून विविध कार निर्माता कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत वाढ करणार आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, किया मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा या सर्व कंपन्यांनी आपल्या आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. 

 3. SBIचे मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड बंद होणार 
  जर तुम्ही एसबीआय बँकेचं मॅग्नेटिक स्ट्रिप असलेलं डेबिट कार्ड वापरत असाल तर तुमचं हे डेबिट कार्ड १ जानेवारीपासून बंद होईल. बँकेने आपल्या ग्राहकांना याची माहिती यापूर्वीच दिली आहे. त्यानुसार बँकेने आपल्या ग्राहकांना बँकेसोबत संपर्क करुन नव्या डेबिट कार्डसाठी अर्ज करण्याचं सांगितलं होतं.

 4. १५ जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य 
  केंद्र सरकारने वाहनांना फास्टॅग हे डिसेंबर महिन्यापासून अनिवार्य केलं होतं. मात्र, नंतर सरकारने याची तारीख वाढवून १५ जानेवारी केली. त्यानुसार १५ जानेवारी पासून राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रॉनिक टोल वसुली सुरु होणार आहे. महामार्गावरुन जाणाऱ्या गाड्यांना फास्टॅग अनिवार्य आहे. ज्या वाहनांना फास्टॅग नसेल त्या वाहनांनी फास्टॅग लेनमध्ये प्रवेश केल्यास त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. 

 5. NEFT देवाण-घेवाण मोफत
  १ जानेवारी २०२० पासून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी एनईएफटी चार्जेस बंद करुन ही सेवा मोफत करण्यात येणार आहे. १६ डिसेंबरपासून देशभरात २४ तासांपासून एनईएफटीची सुविधा सुरु करण्यात आली आहे.

 6. GST रजिस्ट्रेशन 
  जीएसटी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी आधारच्या माध्यमातून जीएसटी रजिस्ट्रेशनचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी रजिस्ट्रेशनचा नवा नियम १ जानेवारी २०२० पासून लागू होत आहे. 

 7. ATM मधून पैसे काढणं 
  एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्याची प्रक्रिया आणखी सुरक्षित करण्यासाठी १ जानेवारीपासून नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पैसे काढण्यासाठी ग्राहकांना बँकेकडून ओटीपी देण्यात येईल. हा ओटीपी एटीएममध्ये एंटर केल्यानंतरच ग्राहकांना पैसे काढता येणार आहेत. हा नियम १० हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी लागू असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी