५०० रुपये लुटणाऱ्याला न्यायालयाने सुनावली १० वर्षांची शिक्षा आणि २५,००० रुपये दंड

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 08, 2019 | 17:15 IST | टाइम्स नाऊ हिंदी

हरियाणातील मानेसर येथे एका व्यक्तीकडून ५०० रुपये लुटणाऱ्या आरोपीला न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच २५,००० रुपयांचा दंड ही भरण्यास सांगितलं आहे. पाहा काय आहे संपूर्ण प्रकार...

10 year imprisonment for thief in Haryana
५०० रुपये लुटणाऱ्याला १० वर्षांचा कारावास, २५,००० रुपये दंड  |  फोटो सौजन्य: Getty Images

गुरूग्राम: हरियाणातील मानेसर जिल्ह्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ही संपूर्ण घटना कळाल्यावर कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मिळालेल्या माहितीनुसार, अनुप शर्मा (२८ वर्षे) आणि कुलदीप (२२ वर्षे) या दोन आरोपींनी २०१७मध्ये एका फॅक्ट्री कर्मचाऱ्याला लुटलं होतं. आरोपींनी या कर्मचाऱ्याकडे असलेले ५०० रुपये घेऊन पळ काढला होता. आता या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे.

सेशन्स कोर्टाने दोन्ही आरोपींना १० वर्षांचा कारावास आणि २५,००० रुपये प्रत्येकी दंड सुनावला आहे. दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायलयाने ही शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५०० रुपयांची चोरी करण्याची ही घटना २३ जुलै २०२७ रोजी घडली होती. त्या दिवशी दुपारच्या सुमारास पीडित राजेश सिंह हे मानेसर येथील आपल्या कंपनीतून घरी परतत होते. त्याच दरम्यान अनुप आणि कुलदीप या दोघांनी राजेश यांना रोखलं आणि त्यांच्याकडील पैसे लुटले. आरोपींनी राजेश सिंह याच्याकडे असलेले ५०० रुपये आणि त्याचं निवडणूक ओळखपत्र दोन्ही घेतलं.

या घटनेनंतर राजेशने पोलिसांना सांगितले की, दोन्ही आरोपींनी त्याच्याकडील पैसे घेतल्यानंतर मारहाण केली. यानंतर राजेशने आराडा-ओरड करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान तेथे पोलिसांची एक गाडी आली आणि मग आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. काही अंतरावर पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडलं.

पोलिसांनी आरोपीं विरोधात मानेसर पोलीस ठाण्यात आयपीसी ३९७ बी आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. शनिवारी या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. नागरिकांना लुटण्याच्या वाढत्या घटनांनंतर लक्षात घेत हरियाणा सरकारने २०१५ साली कायद्यात बदल करत कडक कायदा केला. नव्या कायद्या अंतर्गत आरोपीला कमीत कमी ५ वर्षांची शिक्षा आणि २५,००० रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी