hearing on 16 MLAs in the Supreme Court is likely to be postponed : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधानसभेतील प्रतोद सुनिल प्रभू यांनी काढलेला पक्षादेश (व्हिप) न मानणाऱ्या १६ आमदारांचे निलंबन करावे अशी मागणी झाली. ही मागणी सुनिल प्रभू यांनी केली. विधानसभाध्यक्ष हे पद त्यावेळी रिक्त होते त्यामुळे सुनिल प्रभू यांनी उपाध्यक्षांकडे मागणी सादर केली. यानंतर विधानसभेच्या उपाध्यक्षांकडून सुरू झालेल्या कारवाईला आव्हान देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. या याचिकेवरील सुनावणी सोमवार ११ जुलै २०२२ रोजी घेऊ असे सुटीच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. पण सर्वोच्च न्यायालयातील १६ आमदारांविषयीची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
सुटी संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सोमवार ११ जुलै २०२२ रोजी होणार आहे. पण सोमवारच्या कामकाजात १६ आमदारांविषयीच्या सुनावणीचा समावेश नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आयत्यावेळी सर्वोच्च न्यायालय या सुनावणीसाठी वेळेचे नियोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही न्यायालयीन कामकाजाची माहिती असलेले अभ्यासक सांगत आहेत.
सर्वोच्च न्यायालय सुनावणीसाठी कोणती वेळ देते हे पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होईल. यानंतर दिलेल्या वेळेवर सुनावणी होईल. दोन्ही गट आपापली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडतील. विधानसभेतील ताज्या स्थितीबाबतही सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. यानंतर पुढे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.