झारखंडमध्ये आजपासून सोरेन सरकार, हेमंत सोरेन मुख्यमंत्रिपदी विराजमान

Jharkhand Hemant Soren swearing-in ceremony :हेमंत सोरेन यांनी रांचीच्या मोहरहाबादी मैदानात झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोरेन हे दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. 

Jharkhand Hemant Soren swearing-in ceremony
झारखंडमध्ये आजपासून सोरेन सरकार, हेमंत सोरेन मुख्यमंत्रिपदी विराजमान 

रांचीः झारखंड मुक्ती मोर्चा (JMM)चे हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. रांचीच्या मोरहाबादी मैदानात त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोरेन यांनी या दिवसाला राज्याच्या नवनिर्मितीचा ठराव दिवस असं म्हटलं आहे. सोरेन यांनी प्रसिद्धीपत्रकात राज्यातील सवा तीन कोटी जनतेला आवाहन केलं की, 'मोरहाबादी येथे या आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार होऊ या.'सोरेन हे दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. ते झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री बनलेत. झारखंडचे राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. हेमंत सोरेन यांच्यासोबत 3 मंत्र्यांनी शपथ घेतली. 

कॉंग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आलमगीर आलम यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आलमगीर हे पाकूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. कॉंग्रेसचे आमदार रामेश्वर उरांव यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. उरांव हे झारखंड कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. मनमोहन सरकारमध्ये उरांव हे राज्यमंत्री राहिले आहेत.

आरजेडीचे सत्यानंद भोक्तानं यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भोक्ता हे झारखंडमधील आरजेडीचे एकमेव आमदार आहे. भोक्ता 2014 पर्यंत भाजपमध्ये होते.

यावेळी अनेक विरोधी पक्षनेते सामील झाले आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन, आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि आपचे खासदार संजय सिंह उपस्थित होते. झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.

23 डिसेंबरला  झारखंड निवडणुकीचा निकाल लागला. निकाल झामुमो-कॉंग्रेस आणि आरजेडी युतीच्या बाजूनं आले. झारखंडमध्ये 81 जागा असलेल्या आघाडीला 47 जागा मिळाल्या. सत्ताधारी भाजपला केवळ 25 जागा मिळाल्या. या निवडणुकीत जेएमएमने विक्रमी 30 जागा जिंकल्या आणि त्या विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी