UPSC CDS Topper | केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) घेण्यात आलेल्या कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन 2 (Combined Defence Service Examination 2) या परीक्षेत देशभरातून 42 विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाची यादी अधिकृत वेबसाईटवरून (Official Website) जाहीर कऱण्यात आली आहे. इंडियन मिलिट्री अकॅडमीत (Indian Military Academy) 81 उमेदवार, इंडियन नेव्हल अकॅडमीत (Indian Naval Academy) 47 उमेदवार तर एअरफोर्स अकॅडमीत (Air Force Academy) 14 जणांची निवड करण्यात आली आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानीमध्ये राहणाऱ्या हिमांशु पांडेनं युपीएससी सीडीएस परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
उत्तराखंडमधून भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांचं प्रमाण लक्षणीय असतं. या डोंगराळ आणि पहाडी भागातील अनेक विद्यार्थी त्यांच्या नैसर्गिक शारीरिक क्षमतेमुळे सैन्यात उत्तम कामगिरी बजावताना दिसतात. त्यामुळेच उत्तराखंडचा ‘सैन्य धाम’ असं गौरवानं म्हटलं जातं. यावेळी हिमांशु पांडेनं सीडीएस परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावून उत्तराखंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
लहानपणापासून सैन्यदलात दाखल होण्याचं स्वप्न असणाऱ्या हिमांशुचे वडील एका खासगी कंपनीत ड्रायव्हरची नोकरी करतात. त्याची आई गृहिणी आहे. आपल्या लेकानं मिळवलेलं हे घवघवीत यश पाहून दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शेजारी आणि नातेवाईक यांच्याकडून हिमांशु आणि त्याच्या आईवडिलांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
हिमांशु हा शाळेत असल्यापासून हुशार विद्यार्थी होता. बारावीत त्याला 95 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्याने बी.टेक. ही पदवी मिळवली. पदवीचं शिक्षण सुरू असतानाच त्याने युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती. तिसऱ्या प्रयत्नात त्याला हे यश मिळालं असून होतकरू विद्यार्थ्यांसमोर त्याने आदर्शच प्रस्थापित केला आहे. अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न केले, तर एक दिवस यश नक्की मिळतं, हे त्यानं दाखवून दिलं आहे.
पिथौरागडच्या विनय पुनेथा यानंही सीडीएस परीक्षेत दहावा नंबर पटकावत आईवडिलांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं आहे. विनयचे वडील पिथौरागडमध्ये एक दुकान चालवतात. विनयनं आपलं शालेय शिक्षण गावातूनच पूर्ण केलं आणि लखनौमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.
ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरला होता आणि मुलाखत दिली होती, त्या विद्यार्थ्यांना www.upsc.gov.in या वेबसाईटवर आपला निकाल पाहता येईल. युपीएससीचा अंतिम निकाल हा लेखी परीक्षा आणि एसएसबी इंटरव्यूच्या आधारे निश्चित करण्यात आला आहे. ही मेरिट लिस्ट तयार करताना मेडिकल टेस्ट गृहित धरण्यात आलेली नाही.