म्हणून अमित शहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला फोन, म्हणाले...

वांद्र्या येथे घडलेल्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. फोनवरुन त्यांनी याप्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.

Amit Shah and Uddhav Thackeray
म्हणून अमित शहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला फोन, म्हणाले...  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • वांद्र्या येथे घडलेल्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला.
  • फोनवरुन त्यांनी याप्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.
  • अमित शहा यांनी घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.

मुंबईः वांद्र्या येथे घडलेल्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. फोनवरुन त्यांनी याप्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. तसंच अमित शहा यांनी घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येणे ही काळजीचं कारण आहे. अशा घटना होऊ नयेत याची दक्षता घ्या. अशा घटनांमुळे भारताची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर केंद्र राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची काय स्थिती आहे हे देखील अमित शाह यांनी जाणून घेतलं.

असे प्रकार घडल्यास कोरोना विरोधातली लढाई कमकुवत होईल असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.  वांद्र्यात जी गर्दी झाली होती तसे प्रकार घडणं म्हणजे करोनाविरोधातली लढाई कमकुवत होणं असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. असे कोणतेही प्रकार घडू नयेत म्हणून तुमच्या पाठिशी आम्ही आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. 

वांद्रे स्टेशनबाहेर हजारो मजुरांची गर्दी

वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली आहे. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दुपारी वांद्रे पश्चिम परिसरात स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती.  नागरिकांकडून आपल्या मूळ गावाकडे परत जाण्यासाठी रेल्वेगाडीची मागणी करण्यात आली. वांद्रे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जामा मशिदीच्या जवळ ही गर्दी जमली होती.

वांद्रेमध्ये भागात बस डेपोजवळ जमा झालेल्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यामुळे वांद्रे येथील परिस्थिती चिघळल्याचं दिसत आहे. आम्हाला आमच्या घरी सोडा अशी येथे जमलेल्या नागरिकांची, मजुरांची मागणी होती. याठिकाणी जमलेले जास्तीत जास्त लोक कामानिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत आलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी याठिकाणी कशी जमली याचा तपास पोलीस करत आहेत.

वांद्रा येथे हजारोच्या संख्येने जमा झालेले कामगार जवळच्याच वस्तीमध्ये राहत होते, अशी माहिती मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून ते येथेच राहत होते. या संपूर्ण प्रकाराची मिळताच स्थानिक नेते आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना गर्दीला समजावण्याचा प्रयत्न केला.  पोलीस आणि नेत्यांच्या आवाहनानंतर काही वेळात गर्दी ओसरली. मात्र मुंबईतील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आणि अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी रस्त्यावर येणे गंभीर बाब आहे. सध्या ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी