मुकेश अंबानी यांनी ७५ हजार कोटींचे १५ लाख कोटी रुपयांच्या बिझनेस साम्राज्यात केले रुपांतर, बघा कसे ?

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 19, 2021 | 20:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Happy Birthday Mukesh Ambani: देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)चे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani)आज ६४ वर्षांचे झाले आहेत.

How Mukesh Ambani build Business empire of Rs 15 lacs crore
मुकेश अंबानींनी कसे उभे केल १५ लाख कोटी रुपयांचे साम्राज्य ? 

थोडं पण कामाचं

  • मुकेश अंबानी झाले ६४ वर्षांचे
  • उभे केले १५ लाख कोटी रुपयांचे बिझनेस साम्राज्य
  • ५८ दिवसात उभारले १.६९ लाख कोटी रुपयांचे भांडवल

नवी दिल्ली : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani)आज ६४ वर्षांचे झाले आहेत  (Happy Birthday Mukesh Ambani). फोर्बस रियल टाईम बिलियनेर लिस्टनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ७२.४ अब्ज डॉलर इतकी आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते १३व्या स्थानावर आहेत. त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची कमान मुकेश अंबानी यांच्या हाती दिल्यानंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्सला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आज रिलायन्स देशातील सर्वात मोठी कंपनी असण्याबरोबरच २०२० फॉर्च्युन ग्लोबल ५०० यादीत ९६व्या क्रमांकावर आहे.

मुकेश अंबानींचा प्रवास...

केमिकल इंजिनियरिंगने सुरूवात


रिलायन्सची स्थापना मुकेश यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी केली होती. केमिकल इंजिनियरिंग केल्यानंतर मुकेश अंबानी १९८१मध्ये आपल्या वडिलांसोबत रिलायन्समध्ये रुजू झाले. त्यानंतर त्यांनी रिलायन्स पेट्रोलियम केमिकल्सची सुरूवात केली. १९८५मध्ये त्यांनी रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज लि.चे नाव बदलून रिलायन्स इंडस्ट्रीज असे केले.
६ जुलै २००२ला धीरूभाई यांचे निधन झाल्यानंतर मुकेश अंबानी यांनी पेट्रोलियमव्यतिरिक्त दूरसंचार क्षेत्रात पाऊल टाकले आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सची सुरूवात केली. नंतर वाटणीनंतर ही कंपनी अनिल अंबानी यांच्याकडे गेली.

७५,००० कोटी ते १५ लाख कोटी रुपयांपर्यतचा प्रवास


धीरूभाई अंबानी यांनी आपल्या मुलाला एक मंत्र दिला होता. मोठा विचार करा, लवकर विचार करा आणि पुढचा विचार करा. कारण विचारांवर कोणाचीही मक्तेदारी नसते. मुकेश अंबानी यांनी वडीलांचा मंत्र अंमलात आणला. २००२ मध्ये रिलायन्सचे बाजारमूल्य ७५ हजार कोटी रुपये होते. तर आज रिलायन्सचे बाजारमूल्य १५ लाख कोटी रुपयांवर पोचले आहे.
मुकेश अंबानी यांनी आपल्या कंपनीचा विस्तार पेट्रोलियम व्यतिरिक्त रिटेल, लाईफ सायन्सेस, लॉजिस्टिक्स, दूरसंचार आणि इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रांमध्ये केला आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वानेच रिलायन्सला देशातील सर्वात मोठी कंपनी बनवले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज अंतर्गत अनेक ब्रॅंड कार्यरत आहेत.

रिलायन्स जिओचा धमाका


२०१६ मध्ये मुकेश अंबानी यांनी दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओ लॉंच करून मोठा धमाका केला. त्यावेळेस देशात २जी आणि ३ जी वर दूरसंचार कंपन्यांचे लक्ष केंद्रीत होते. मुकेश अंबानी यांनी ४जी बाजारात आणून या कंपन्यांना निकाली काढले. आज रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे. २०२१पर्यत रिलायन्सला कर्जमुक्त बनवण्याचे उद्दिष्ट मुकेश अंबानी यांनी ठेवले होते. ते त्यांनी पूर्ण करून दाखवले. मागील वर्षभरात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि देशांतर्गत गुंतवणुकीद्वारे त्यांनी १.६९ लाख कोटी रुपयांचे भांडवल उभारले. देशात कोरोना महामारीचे संकट उभे असताना मुकेश अंबानी यांनी ही घोडदौड करून दाखवली.

रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओ प्लॅटफॉर्म्सचा एक चतुर्थांश हिस्सा विकून १.१५ लाख कोटी रुपये आणि राईट्स इश्यूद्वारे ५२,१२४.२० कोटी रुपयांचे भांडवल उभे केले. फक्त ५८ दिवसांत कंपनीने हे भांडवल उभारले, हे विशेष.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी