Hunga Tonga-Hunga Haapai Volcano Erupts : टोंगा : टोंगा बेटावर शनिवारी समुद्राच्या पाण्याखाली ज्वालामुखीचा स्फोट झाला. या स्फोटानंतर धुराचा मोठा फुगा निर्माण झाला आणि राख आसपासच्या २० किमी परिसरात पसरली. टोंगामध्ये राख आणि लहान-मोठ्या दगडांचा पाऊस पडला. ज्वालामुखीच्या स्फोटानंतर पुढील काही दिवसांसाठी अमेरिका आणि जपान या दोन देशांनी नागरिकांना पॅसिफिक महासागराच्या (प्रशांत महासागर) किनाऱ्यापासून लांब राहा असा खबरदारीचा इशारा दिला आहे.
टोंगा आणि आसपासच्या बेटांवर संपर्काच्या पुरेश्या आधुनिक यंत्रणा उपलब्ध नाही. बेटांवरील इंटरनेट कनेक्शन ज्वालामुखीच्या स्फोटात ठप्प झाले आहे. यामुळे ज्वालामुखीच्या स्फोटानंतर नेमकी परिस्थिती काय आहे याचा अंदाज येण्यास वेळ लागेल; अशी माहिती अमेरिकेतील भूगर्भतज्ज्ञांनी दिली.
ज्वालामुखीच्या स्फोटानंतर खबरदारीचा उपाय म्हणून टोंगा बेटाच्या प्रशासनाने राजा टुपो सहावे यांना समुद्र किनाऱ्यावरील महालातून उंचावरच्या सुरक्षित ठिकाणी नेले आहे. नागरिकांनाही समुद्र किनाऱ्यापासून दूर उंच अशा सुरक्षित जागेवर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अमेरिकेतील भूगर्भतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वालामुखीच्या स्फोटानंतर थोड्याच वेळाने समुद्रात उसळलेल्या मोठ्या लाटा आदळल्यामुळे टोंगा बेट आणि आसपासच्या परिसराचे नुकसान झाले. तसेच ज्वालामुखीनेही टोंगाचे नुकसान झाले. पण हानीचे नेमके स्वरुप अद्याप समजलेले नाही. समुद्रात ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर पॅसिफिक महासागरात (प्रशांत महासागर) न्यूझीलंड पासून अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतापर्यंतच्या समुद्रात अनेक ठिकाणी जहाजांचे कमी-जास्त नुकसान झाल्याचे वृत्त आहे. ज्वालामुखीचा स्फोट हा ५.८ रिश्टर क्षमतेच्या भूकंपासारखा होता.
सूनामीमुळे दोन महिलांचा मृत्यू
टोंगा येथे ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर मोठ्या लाटा किनाऱ्यावर धडकल्या. या सूनामीचा फटका पेरू या देशालाही बसला. तिथे दोन महिलांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
पॅसिफिक महासागराच्या (प्रशांत महासागर) दक्षिणेकडील भागात १६९ बेटांचा समुह आहे. यापैकी ३६ बेटांवर नागरी वस्ती आहे. या बेटांच्या समुहाला किंगडम ऑफ टोंगा अर्थात टोंगाचे राज्य असे म्हणतात. या राज्यात राजेशाही व्यवस्था आहे. टोंगाची लोकसंख्या १ लाख ५ हजार किंवा १ लाख १० हजार असल्याचा अंदाज आहे. टोंगा राज्याच्या निवडक सैनिकांनी अफगाणिस्तान आणि इराक या दोन्ही देशांमध्ये काम केले आहे. इराकमधून टोंगा राज्याचे सर्व सैनिक सुरक्षितरित्या २००८ पर्यंत मायदेशी परतले होते. तसेच २०१४ मध्ये अफगाणिस्तानमधून टोंगाचे सैनिक परतले होते.