मुजफ्फरपूर: Crime on Karwa chauth: देशभरात करवा चौथ सण कालच उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देशातील अनेक भागात महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवासही केले. या व्रतामधून पतीविषयी वाटणारं प्रेम पत्नी व्यक्त करत असते. पण याच सणाच्या दिवशी एका पतीने आपल्या पत्नीसोबत असं कृत्य केलं आहे की, ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका पतीने आपल्या पत्नीची चक्क जीभच कापून टाकली आहे. खरं तर आरोपी पतीच्या दोन बायका आहेत. त्यामुळे दोन्ही बायकांमध्ये सतत वाद व्हायचे. त्यांच्या रोजच्या वादाला वैतागून पतीने अतिशय भयंकर पाऊल उचललं. दरम्यान, पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या नवऱ्याविरोधात आणि त्याच्या पहिल्या पत्नी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
ही घटना बिहारमधील मुजफ्फपूरमध्ये घडली आहे. आरोपी पतीने आपल्या दुसऱ्या पत्नीची जीभ कापली कारण की, ती त्याच्या पहिल्या पत्नीसोबत सतत भांडत होती. दरम्यान, याप्रकरणी पीडित महिलेच्या माहेरकडील लोकांनी असा आरोप केला आहे की, आरोपी पतीच्या पहिल्या पत्नीला मूल होत नसल्याने त्याने फसवणूक करुन दुसरं लग्न केलं. पण नंतर पती आपल्या पहिल्या पत्नीच्या साथीने दुसऱ्या पत्नीला सतत त्रास देत होता. यावरुन दोनी सवतींमध्ये सतत वाद होत होते. काल (गुरुवार) देखील अशाच प्रकारे भांडण झालं, जेव्हा दोघींमध्ये भांडण सुरु होतं तेव्हा त्यांचा पती हा नुकताच राजस्थानवरुन घरी परतला होता. यावेळी त्या दोघींना भांडताना पाहून त्याचा संताप खूपच अनावर झाला.
दरम्यान, पत्नी आणि पतीच्या त्रासामुळे दुसरी पत्नी घराबाहेर येऊन जोरजोरात आरडाओरड करत होती. यामुळे संतापलेल्या पतीने तिला घरात नेऊन एका खोलीत बंद केलं आणि बेदम मारहाण केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या पत्नीची जीभच बेल्डने कापून टाकली. यानंतर जखमी अवस्थेतच स्थानिकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. सुरुवातीला तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
स्थानिक लोकांनी आरोपी पतीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. दरम्यान, पीडित महिलेच्या आईने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये तिने म्हटलं आहे की, 'तिचा जावई आणि त्याची पहिली पत्नी यांनीच आपल्या मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. दरम्यान, ते तिला नेहमीच तिची जीभ कापण्याची धमकी देत होते.'
सध्या पीडित महिलेची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं समजतं आहे. डॉक्टरांच्या मते, तिच्या शरीरातून बरंच रक्त वाया गेलं आहे. तसंच तिची जखम देखील खूपच गंभीर आहे.