GHMC result: ओवैसींच्या गडात भाजपची जोरदार मुसंडी, 'इतक्या' जागांवर मिळवला विजय 

Hyderabad GHMC Election results 2020: हैदराबाद महानगपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार प्रदर्शन केल्याचं पहायला मिळत आहे. 

BJP Flag
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • महानगरपालिका निवडणुकीत टीआरएसने सर्वाधिक जागा जिंकल्या 
  • भाजप दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष, भाजपने एमआयएमला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले
  • गेल्या निवडणुकीत भाजपला अवघ्या तीन जागांवर मिळवता आला होता विजय

हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (Greater Hyderabad Municipal Corporation) निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या आणि अखेर निवडणुकीचे निकाल जाहीर (election results declared) झाले आहेत. ही महानगरपालिका चार जिल्ह्यांत पसरलेली असल्याने तसेच त्यामध्ये पाच लोकसभा आणि २ विधानसभा मतदारसंघ येत असल्याने या निवडणुकीला वेगळचं महत्व प्राप्त झाले होते. या महानगरपालिका निवडणुकीत टीआरएस म्हणजेच तेलंगणा राष्ट्र समितीने (Telangana Rashtriya Samithi) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर भाजप (BJP) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. 

कुठल्या पक्षाला किती जागांवर विजय

राजकीय पक्ष विजय मिळवलेल्या जागा
तेलंगणा राष्ट्र समिती ५५
भारतीय जनता पार्टी ४८
एमआयएम ४४
काँग्रेस

ओवैसींच्या गडाला सुरुंग 

एमआयएमच्या ओवैसी यांचा गड मानल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये भाजपने ४८ जागांवर विजय मिळवला आहे. तर टीआरएसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. गेल्या निवडणुकीत टीआरएसने ९९ जागा, एमआयएमने ४८ जागा तर भाजपने अवघ्या तीन जागांवर विजय मिळवला होता. भाजपने ४८ जागांवर विजय मिळवत ओवैसींना चांगलाच धक्का दिला आहे. ओवैसींचा पक्ष या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

तेलंगणातील भाजपच्या कामगिरीबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करत म्हटलं, पंतप्रधानांवर विश्वास ठेवल्याबद्दल तेलंगणाच्या जनतेचे आभार. नागरिकांनी विकासाच्या अजेंड्यावर विश्वास व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री किशन रेड्डी यांनी म्हटलं, या विजयामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, भाजपासाठी राज्यस्तरीय विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. जर काँग्रेस पक्षाबाबत बोलायचं झालं तर त्यांचा लाजीरवाणा पराभव झाला आहे आणि त्यामुळेच तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एन उत्तम रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या?

हैदराबाद महानगरपालिकेच्या एकूण १५० जागांसाठी ही निवडणूक झाली होती. या सर्वच्या सर्व १५० जागांवर तेलंगणा राष्ट्र समितीने आपले उमेदवार उभे केले होते. भाजपने १४९ जागांवर उमेदवार उभे केले होते. काँग्रेस पक्षाने १४६ तर एमआयएमने ५१ जागांवर उमेदवार उभे केले होते. 

भाजपच्या दिग्गज नेत्यांनी केला होता प्रचार 

हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने दिग्गज नेत्यांची फळी प्रचारासाठी मैदानात उतरवली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतरही दिग्गज नेत्यांनी भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता. अमित शहा यांनी तर रोड शो सुद्धा केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी