IAF AN-32: एएन-३२ विमान दुर्घटनेतील सर्व १३ जणांचा मृत्यू; हवाई दलाची माहिती

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 13, 2019 | 16:26 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

IAF AN-32: एएन-३२ या दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत. पण, भारतीय हवाई दलाने या अपघातात कोणीही जिवंत नसल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात त्या १३ जणांच्या कुटुंबियांना याची माहितीही देण्यात आली आहे.

IAF AN-32
एएन-३२ विमान दुर्घटनेतील सर्व प्रवाशांचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : अरूणाचल प्रदेशमध्ये एएन-३२ या दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत. पण, भारतीय हवाई दलाने या अपघातात कोणीही जिवंत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात त्या १३ जणांच्या कुटुंबियांना याची माहितीही देण्यात आली आहे. या अपघातग्रस्त एएन-३२ विमानात आठ क्रू मेंबर्ससह १३ प्रवासी होते. ३ जूनपासून हे विमान बेपत्ता होते. दोन दिवसांपूर्वी या विमानाचे अवशेष सापडले आहेत. विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय हवाई दल आणि लष्कराच्या जवानांनी दिवस-रात्र एक केली होती. विमानाचा अपघात झाल्याचं हे समजल्यानंतरच त्यात कोणी बचावल्याची शक्यता कमी असल्याचं हवाई दलाकडून सांगण्यात आलं होतं. पण, तरीही कोणी जखमी होऊन बचावल्याची आशा होती. अखेर आज, हवाई दलानंच कोणी बचावलं नसल्याचं जाहीर केलं आहे.

१२ हजार फुटांवर दुर्घटना

भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान जोरहाट एअरबेसवरून अरूणाचल प्रदेशच्या दिशेनं उड्डाण केल्यानंतर एका तासानंतर बेपत्ता झाले होते. तीन जून रोजी या विमानाने उड्डाण केल्यानंतर अरूणाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात या विमानाचा संपर्क तुटला होता. या विमानाच्या शोधासाठी जवळपास नऊ दिवस मोठी यंत्रणा कार्यरत करण्यात आली होती. यात एसयू-३० जेट लढाऊ विमान, सी१३०जे, एमआय १७ आणि एएलएच हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. तसेच इस्त्रोच्या कार्टोसॅट आणि आरआयसॅट या उपग्रहांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या फोटोंचाही आधार घेण्यात आला होता. त्यानंर अरूणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यात लीपो गावापासून १६ किलोमीटर अंतरावर या एएन-३२ या दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडले. समुद्र सपाटीपासून १२ हजार फुटांवर विमान अपघातग्रस्त झाले आहे. अपघाताच्या ठिकाणी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्यावेळी विमानाला दुर्घटना झाली त्यावेळी एएन-३२ हे विमान १७ हजार फूट उंचावर उडत होते. त्यामुळे विमान दुर्घटनेत कोणी वाचले असल्याची शक्यता नसल्याचे हवाई दलाने सांगितले आहे.

नातेवाईकांना देण्यात आली माहिती

वायू दलाचे माजी एअर ऑफिसर कमांडिंग इन चिफ मार्शल आर. डी. माथूर यांनी या विमान दुर्घटनेत बचाव पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहिले. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणि त्याचे अवशेष सापडल्यानंतर विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात येत होता. त्यांना या दुर्घटनेची कल्पना देण्यात आल्याचे हवाई दलाकडून सांगण्यात आले. या विमानाचे पायलट फ्लाइट लेफ्टनंट आशिष तन्वर विमानाचे पायलट होते. विमान उड्डाण केले त्यावेळी आणि ते बेपत्ता झाले त्याक्षणी आशिष यांच्या पत्नी संध्या एअर ट्रॅफिक कंट्रोलचे काम पाहत होत्या. त्यांना विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचा अंदाज त्याचवेळी आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IAF AN-32: एएन-३२ विमान दुर्घटनेतील सर्व १३ जणांचा मृत्यू; हवाई दलाची माहिती Description: IAF AN-32: एएन-३२ या दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत. पण, भारतीय हवाई दलाने या अपघातात कोणीही जिवंत नसल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात त्या १३ जणांच्या कुटुंबियांना याची माहितीही देण्यात आली आहे.
Loading...
Loading...
Loading...