भारत-चीन सीमावाद सुरू असताना भारतीय हवाई दलाचा मोठा निर्णय 

India to buy sukhoi fighter aircraft: भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरू असताना आता भारतीय वायुसेनेने नवीन रशियन लढाऊ विमान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

sukhoi fighter jets
सुखोई लढाऊ विमान (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • भारतीय वायुसेनेची मोठी तयारी 
  • सुखोई ३० एमकेआय आणि मिग-२९ या लढाऊ विमान खरेदीचा प्रस्ताव
  • भारतीय वायुदलाने ६००० कोटी रुपयांचा संरक्षण साहित्य खरेदी प्रस्ताव सरकारकडे

नवी दिल्ली: लद्दाखमध्ये भारत (India) आणि चीन (China) मध्ये सीमावादावरुन तणाव वाढला आहे. या वाढलेल्या तणावातच दोन दिवसांपूर्वी भारत-चीन सैन्यात मोठा संघर्ष झाला. या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. यामुळे तणाव आणखी वाढला आहे. याच दरम्यान आता भारतीय वायुदलाने (Indian Air Force) आपली ताकद आणखी वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी रशियाकडून लढाऊ विमाने (Fighter aircraft) खरेदी करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला आहे. भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC)वर भारतीय सैन्याने सैन्यांची कुमक वाढवली आहे. 

६००० कोटी रुपयांचा प्रस्ताव 

एएनआय वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, "भारतीय वायुदल या प्रस्तावावर गेल्या अनेक दिवसांपासून काम करत होती मात्र, आता ही प्रक्रिया वेगाने सुरू करण्यास सुरूवात झाली आहे. संरक्षण साहित्य खरेदीचा हा प्रस्ताव जवळपास ६००० कोटी रुपयांचा आहे. या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी पुढील आठवड्यात संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत सादर करण्यात येईल." सूत्रांच्या मते, अलीकडे झालेल्या काही अपघातात वायुदलाने आपली अनेक लढाऊ विमाने गमावली आहेत. त्यामुळे आता रशियाकडून १२ सुखोई-२० एमकेआय लढाऊ विमान खरेदी करण्याचा प्रस्ताव घेण्यात आला आहे. भारताने १० ते १५ वर्षांत २७२ सुखोई-३० विमानं खरेदीची ऑर्डर दिली आहे.

गलवान खोऱ्यात तणाव वाढला 

१५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षानंतर सीमेवर तणाव वाढला आहे. लद्दाख, हिमाचल प्रदेश, सिक्किम आणि अरुणाचलप्रदेशला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी)वर भारतीय सैन्याने आपल्या सैन्यांची कुमक वाढवली आहे. तसेच एलएसीजवळ असलेल्या भारतीय हवाई दलाच्या तळांना अलर्ट करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त नौदल हिंद महासागरात आपल्या युद्धनौकांची संख्या वाढवत आहे. बुधवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत बैठक घेतली आणि तिन्ही सैन्यदलांना सतर्क राहण्याचे सांगितले आहे.

गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. तर भारतीय सैन्याने चीनी सैन्याला दिलेल्या प्रत्युत्तरात काही चीनी सैनिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. चीनी सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या संपादकांच्या मते, या संघर्षात चीनच्या सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी