UP Government on Loudspeakers: नवी दिल्ली : महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आणि भोंग्यावरुन राजकारण (Politics) तापलं आहे. मनसे (MNS) अध्यक्ष (President) राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भोंगे (Loudspeakers) काढण्यासाठी केलेल्या घोषणेनंतर राजकारणात मोठा गदारोळ झाला. दरम्यान काल मुंबईत धार्मिक स्थळांवरील भोंग्यांविषयी झालेल्या बैठकीत ठोस निर्णय झालेला नाही. अशात उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारने (Government) त्याविषयी धडाडीचा निर्णय घेत अवैध भोंग्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने राज्यात लाऊडस्पीकरच्या वापरावर मोठा निर्णय घेतला आहे. नव्या आदेशानुसार धार्मिक स्थळांवरील बेकायदा लाऊडस्पीकर ३०एप्रिलपर्यंत हटवण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात ३० एप्रिलपर्यंत कारवाईचा अहवाल मागवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी दिली. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी यांनी सांगितले की, राज्यातील धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर लाऊडस्पीकर काढून टाकण्याचे आदेश शनिवारी जारी करण्यात आले आहेत.
या संदर्भात सर्व जिल्ह्यांकडून ३० एप्रिलपर्यंत अहवाल मागवण्यात आला आहे. अवस्थी यांच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात पोलिसांना धार्मिक नेत्यांशी संवाद साधून आणि त्यांच्याशी समन्वय साधून बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवारी अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत 125 बेकायदेशीर लाऊडस्पीकर काढण्यात आले आहेत. तर 17 हजार लोकांनी स्वतःहून लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला आहे. याआधी ईद आणि अक्षय्य तृतीया आणि येणारे अनेक महत्त्वाचे धार्मिक सण लक्षात घेता, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सणांच्या वेळी माईकचा वापर करता येईल, मात्र माईकचा आवाज परिसराबाहेर जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश दिले होते.
यावेळी अक्षय्य तृतीया आणि ईद हे सण एकाच दिवशी (३ मे) साजरे होणार आहेत. याद्वारे पोलिसांच्या तयारीवर प्रशांत कुमार यांनी सांगितले आहे की, अलविदा जुमा (रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार) 31 हजार ठिकाणी नमाज अदा करण्यात येणार आहे. ते म्हणाले की संवेदनशील जिल्ह्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे आणि पीएसी आणि केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलांसह अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. याशिवाय शांतता समित्यांच्या बैठकाही झाल्या आहेत. जेणेकरून कोणत्याही प्रकारे अशांततेचे वातावरण निर्माण होऊ नये.