इमरान खानवर राजीनाम्यासाठी वाढला दबाव

Imran Khan under 'immense pressure' to resign पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यावर ३१ जानेवारीच्या आधी राजीनामा देण्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.

Imran Khan under 'immense pressure' to resign
इमरान खानवर राजीनाम्यासाठी वाढला दबाव 

थोडं पण कामाचं

  • इमरान खानवर राजीनाम्यासाठी वाढला दबाव
  • सर्व सामजिक, आर्थिक वर्गातील नागरिकांनी इमरान खान विरोधी आंदोलनात सहभावी व्हावे; विरोधकांचे आवाहन
  • पाकिस्तानमध्ये पंतप्रधान मोदींची पोस्टर

इस्लामाबादः पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यावर ३१ जानेवारीच्या आधी राजीनामा देण्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. देशातील ११ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटची स्थापना केली आहे. पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट मंगळवारी १९ जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर आंदोलन करणार आहे. याच दिवशी पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांची मुलगी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ गटाच्या उपाध्यक्ष मरियम नवाझ रावळपिंडीत एक मोठी सभा घेणार आहे. इमरान खान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी होत असलेल्या या सभेच्या निमित्ताने विरोधक शक्तीप्रदर्शन करणार आहेत. (Imran Khan under 'immense pressure' to resign)

पाकिस्तान चीनची वसाहत होत आहे, विरोधकांचा इमरान खान सरकारवर गंभीर आरोप

माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे प्रयत्न इमरान खान सरकार करत आहे. हे प्रयत्न सुरू असतानाच इमरान खान सरकारवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप होऊ लागले आहेत. इमरान खान सरकारवरील आरोप अतिशय गंभीर आहेत. इमरान खान सरकारने बदल्याच्या भावनेतून नवझा शरिफ यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे, अशी भूमिका पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ गटाने घेतली आहे. 

इमरान खान सरकारच्या कारभारामुळे पाकिस्तान हा देश चीनची वसाहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे नागरिक आणि विरोधक इमरान खान सरकारवर प्रचंड नाराज आहेत. भ्रष्ट इमरान खान आणि त्यांच्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. 

सर्व सामजिक, आर्थिक वर्गातील नागरिकांनी इमरान खान विरोधी आंदोलनात सहभावी व्हावे; विरोधकांचे आवाहन

इमरान खान पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे पाकिस्तानचे केंद्र सरकार बरखास्त होईल. याच कारणामुळे विरोधक इमरान खान यांनी ३१ जानेवारी पर्यंत राजीनामा द्यावा असा दबाव टाकत आहेत. इमरान खान सरकारचे विरोधक असलेल्या राजकीय पक्षांनी, विचारवंतांनी, साहित्यिक, कलाकार, शेतकरी, वकील, डॉक्टर, नर्स, वैद्यकीय क्षेत्रातील इतर कर्मचारी, सर्व कामगार संघटनांनी आणि इतर नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

याआधी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेता बिलावल भुट्टो यांनी इमरान खान सरकार विरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची तयारी करत असल्याचे जाहीर केले. यामुळे एकाचवेळी अविश्वास प्रस्ताव आणि रस्त्यावर विरोधकांचे मोर्चा, सभा या स्वरुपातील शक्तीप्रदर्शन यातून इमरान खान सरकार विरोधात वातावरण निर्माण होत आहे. विरोधक नागरिकांच्या समर्थनाच्या जोरावर इमरान खान सरकार पाडण्यासाठी सक्रीय झाले आहेत. 

पाकिस्तानमध्ये पंतप्रधान मोदींची पोस्टर

पाकिस्तानच्या बलुचिस्तान, पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि सिंध प्रांतामध्ये स्वातंत्र्याची मागणी जोर धरत आहे. रविवारी सिंधमध्ये आयोजित एका मोर्चात अनेकांनी हातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्टर घेतली होती. आंदोलकांनी जागतिक पटलावर प्रभावी असलेल्या नेत्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत करावी, अशी मागणी केली. सिंधुदेश अर्थात सिंधुस्तानसाठी घोषणाबाजी झाली. सिंधी राष्ट्रवादाच्या संस्थापकांपैकी एक जीएम सय्यद यांच्या ११७व्या जयंतीचे निमित्त साधून स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. 

सिंधू नदीच्या खोऱ्यात सिंधू संस्कृती आहे. या संस्कृतीचे पालन करणाऱ्यांना इंग्रजांना बेकायदा पद्धतीने पाकिस्तान या कडव्या इस्लामी विचारांच्या देशात ढकलून दिले. पाकिस्तानमधील उच्च पदस्थांनी सिंधू खोऱ्यातील खनिज संपत्ती लुबाडली. मानवाधिकारांचे उल्लंघन केले. नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले. या त्रासातून सुटकेसाठी स्वतंत्र सिंधुदेश अर्थात सिंधुस्तानची निर्मिती आवश्यक असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी