१४ वर्षापूर्वी आत्महत्या केलेल्या महिलेला पोलिसांनी केली अटक, पाहा काय आहे नेमकं प्रकरण

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 23, 2019 | 23:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

गुजरातमध्ये एका धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका अशा महिलेला अटक केली आहे की, जिच्या मृत्यूची आत्महत्या अशी १४ वर्षापूर्वी नोंद करण्यात आली होती.

arrest_TS
१४ वर्षापूर्वी आत्महत्या केलेल्या महिलेला पोलिसांनी केली अटक  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • १४ वर्षापूर्वी महिला अचानक सापडली पोलिसांना
  • प्रेमप्रकरणात भलत्याच महिलेला गमवावा जीव
  • विचित्र घटनेने गुजरात पोलीस देखील चक्रावले

अहमदाबाद: गुजरातमधील पाटन येथील बलवा गावात एक अतिशय विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ज्यामुळे गुजरात पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. बलवा गावातील एका महिला जिचा १४ वर्षापूर्वी मृत्यू झाला होता, ती आता चक्क जिवंत सापडली आहे. काय तुम्हालाही धक्का बसला ना. पण जी महिला मृत समजली जात होती तिचा मृत्यू झालाच नव्हता. तर ती स्वत:च्या एका महिलेच्या खुनातील आरोपी म्हणून तब्बल १४ वर्षानंतर समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळजवळ १७ वर्षांपूवी प्रकाश पांचाल यांचा विवाह भीखिबेन हिच्याशी झाला होता. पण नंतर भीखिबेन ही विजुभा राठोड याच्या प्रेमात पडली. हे सगळेजण एकत्रच राहत होते. 

खरं तर विजुभा हा भीखिबेन हिच्याशी लग्न करु शकत नव्हता कारण की, भीखिबेन हिचं आधीच प्रकाश पांचालशी लग्न झालं होतं. एवढंच नव्हे तर त्यांना एक मुलगा देखील होती. पण आपलं हे प्रेम प्रकरण गुप्त ठेवण्यासाठी विजुभा आणि भीखिबेन यांनी एक मास्टर प्लॅन तयार केला. 

एका मीडिया रिपोर्टनुसार, ६ फेब्रुवारी २००५ रोजी भीखिबेन आणि तिचा पती प्रकाश यांच्या कोणत्या तरी कारणावरुन बराच वाद झाला होता. त्यामुळे भीखिबेन ही संतापून दुसऱ्या रुममध्ये झोपण्यासाठी गेली होती. पण त्यानंतर भीखिबेन ही कुणालाच सापडली नाही. ती अचानक रुममधून गायब झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा बराच शोध घेतला होता. याच दरम्यान, तिच्याच घराच्या मागे एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिचे कुटुंबीय तो मृतदेह ओळखण्यात अपयशी ठरले होते. पण त्या मृत महिलेच्या अंगावर भीखिबेनचे कपडे होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना असं वाटलं की, भीखिबेन हिने स्वत:च जळून घेत आत्महत्या केली असावी.

पोलिसांनी देखील या प्रकरणी आत्महत्येचीच नोंद केली. पण जवळजवळ १४ वर्षांनी भीखिबेन ही अचानक जिंवत आढळून आली. प्रकाश पांचाल याचा एक मित्र हा काही कामानिमित्त गुजरातच्या मेहसाणामध्ये गेला होता. तिथेच त्याला त्याच्या मित्राची म्हणजेच प्रकाश पांचाल यांची पत्नी भीखिबेन तब्बल १४ वर्षानंतर दिसून आली. जेव्हा प्रकाशच्या मित्राने भीखिबेनबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला असं समजलं की, तिने तिच्या प्रियकर विजुभा याच्याशी लग्न केलं आहे. संपूर्ण प्रकाराने तो मित्र हैराण झाला. त्याने तात्काळ याबाबतची माहिती प्रकाश पांचाल याला दिली. त्याने यासंबंधी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. 

पोलिसांनी मेहसाणा येथून भीखिबेन हिला ताब्यात घेतलं आणि याप्रकरणाबाबतचं सत्य जाणून घेतलं. १४ वर्षापूर्वी आपली ओळख बदलून भीखिबेन ही विजुभासोबत मेहसाणा येथे राहण्यासाठी आली होती. यावेळी भीखिबेन हिने पोलिसांना अशी माहिती दिली की, 'मी विजुभा आणि त्याच्या मित्रांनी पळून जाण्यासाठी एक योजना तयार केली होती. त्यासाठी मी, विजुभा आणि त्याच्या मित्रांनी एका मानसिकरित्या विक्षिप्त महिलेचं अपहरण करुन तिची हत्या केली होती.' 

तिघांनी मृत महिलेवर भीखिबेनचे कपडे टाकले होते. तसंच तिचा चेहरा देखील जाळून टाकला होता. कारण की, लोकांनी ही महिला नेमकी कोण आहे हे ओळखू नये. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी भीखिबेन आणि विजुभा यांच्यासह इतरही काही लोकांना अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
१४ वर्षापूर्वी आत्महत्या केलेल्या महिलेला पोलिसांनी केली अटक, पाहा काय आहे नेमकं प्रकरण Description: गुजरातमध्ये एका धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका अशा महिलेला अटक केली आहे की, जिच्या मृत्यूची आत्महत्या अशी १४ वर्षापूर्वी नोंद करण्यात आली होती.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...