भारतातील वाघांच्या संख्येत विक्रमी वाढ

जंगलात वाघोबाचं साम्राज्य वाढतंय अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

India 2018 Tiger Census makes it to Guinness Book of World Records
भारतातील वाघांच्या संख्येत विक्रमी वाढ 

थोडं पण कामाचं

  • भारतातील वाघांच्या संख्येत विक्रमी वाढ
  • भारतात २ हजार ९६७ वाघ, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली मोजणी
  • देशातील २६ हजार ७६० ठिकाणी झाली वाघांची मोजणी

नवी दिल्ली: जंगलात वाघोबाचं साम्राज्य वाढतंय अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी दिली. त्यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली.

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ (बंगाली वाघ/Bengal Tiger) आहे. पण मागील काही वर्षात वाघांच्या संख्येत घट झाली होती. वाघांची संख्या वाढावी यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने प्रयत्न सुरू होते. हे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. सरकारने वाघांची संख्या दुप्पट व्हावी यासाठी एक कालावधी निश्चित करुन मोहीम हाती घेतली होती. मात्र हा कालावधी संपण्याच्या चार वर्ष आधीच वाघांची संख्या दुप्पट झाली. 

भारतात २ हजार ९६७ वाघ, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली मोजणी

मोजणीच्या निष्कर्षानुसार देशात २ हजार ९६७ वाघ (Tiger) आहेत. वाघांची संख्या मोजण्यासाठी जंगलात ठिकठिकाणी कॅमेरे बसवून फोटो  काढले जातात. या पद्धतीने साडेतीन कोटी फोटो घेण्यात आले. हे फोटो तपासल्यानंतर ७६ हजार ५२३ फोटो वाघांचे आणि ५१ हजार ३३७ फोटो बिबळ्यांचे (Leopard) असल्याचे लक्षात आले. बाकीच्या फोटोंमध्ये वाघ आढळला नव्हता वा फोटो क्लिक होण्यापूर्वी वाघ निघून गेला होता. यानंतर प्रत्येक फोटो स्वतंत्रपणे तपासून किती फोटो एकाच वाघाचे आहेत हे बघितले गेले. या पद्धतीने वर्गीकरण करुन अखेर देशात २ हजार ९६७ वाघ असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. वन्य पशूपक्ष्यांच्या मोजणीसाठी वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान वापरुन वाघांची मोजणी करण्यात आली.

देशातील २६ हजार ७६० ठिकाणी झाली वाघांची मोजणी

भारतातील २६ हजार ७६० ठिकाणी वाघांची मोजणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली. मोजणीसाठी १३९ फेऱ्यांमध्ये साडेतीन कोटी फोटो घेण्यात आले होते. देशातील १ लाख २१ हजार ३३७ चौरस किलोमीटर परिसरात वाघांच्या मोजणीचे काम करण्यात आले.

रशियातील परिषदेत केला होता संकल्प

जगातले वाघ कमी होत असल्याचे लक्षात आल्यावर भारत सरकारने रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत वाघांचे संरक्षण करण्याचा तसेच २०२२ पर्यंत देशातल्या वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प केला होता. हा संकल्प २०१० मध्ये करण्यात आला आणि २०१८ मध्ये झालेल्या मोजणीचे वर्गीकरण पूर्ण होऊन निष्कर्ष आला त्यावेळी लक्ष्य साध्य झाल्याचे लक्षात आले.

वाघांच्या बाबतीत 'आत्मनिर्भर भारत'

वाघांची संख्या वाढण्याच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर झाला असेच म्हणावे लागेल. देशाने निर्धारीत लक्ष्य चार वर्ष आधीच स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण केले. या कामगिरीची दखल गिनीज बुकने घेतली. वाघांच्या संख्येच्या बाबतीत भारताने नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. जगात सर्वाधिक वाघ भारतात आहेत. जगातील ७५ टक्के वाघ भारतात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या 'संकल्प से सिद्धी' या मोहिमेतून देशाने वाघांच्या बाबतीतले लक्ष्य ४ वर्ष आधीच पूर्ण केल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी