अशी आहे भारत-पाकिस्तान फाळणीची गोष्ट, जिन्नाचा हट्ट आणि इंग्लंडच्या धूर्तपणाने झालेली वाताहात!

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 14, 2019 | 17:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

India-Pakistan Partition Story: भारत आणि पाकिस्तानमध्ये आज स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला जात असला पण स्वातंत्र्यासोबतच फाळणीच्या कधीही न विसरता येणाऱ्या कठू आठवणी आज देखील तितक्याच ताज्या आहेत.

partition_BCCL
अशी आहे भारत-पाकिस्तान फाळणीची गोष्ट!  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीने घेतला होता १० लाख लोकांचा जीव
  • मोहम्मद अली जिन्नांच्या हट्टामुळे झाली होती फाळणी
  • फाळणीदरम्यान अनेकांना आपलं सारं काही गमवावं लागलं होतं.

नवी दिल्ली: देश ७३वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. पण आपण ज्या स्वातंत्र्य दिनाचं आज सेलिब्रेशन करत आहोत ते आपल्याला प्रचंड संघर्ष आणि बलिदानानंतर मिळालं आहे. हे कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्टला असतो. तर पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्टला असतो. दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळून आज सात दशकं उलटली आहेत. अशावेळी हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल की, कशाप्रकारे ब्रिटिश भारताचे दोन तुकडे झाले आणि दक्षिण आशियात स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आलेले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आतपर्यंत कशाप्रकारे राहिले आहेत.

ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळावं यासाठी आंदोलनाची ठिणगी ही १९व्या शतकातच पडली होती. खरं तर याची सुरुवात ही १८५७ मध्येच झाली होती. १९२० मध्ये महात्मा गांधी हे स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचे नेते म्हणून उदयास आले. ज्यांच्या पाठिशी संपूर्ण देश कायम ठामपणे उभा राहिला. १९४२ साली महात्मा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने 'भारत छोडो' आंदोलन सुरु केलं होतं. ही ती वेळ होती जेव्हा ब्रिटन हा दुसऱ्या महायुद्धात अडकून पडला होता. ज्यामध्ये ब्रिटनच्या लष्करात तब्बल २५ लाख भारतीय सैनिकांचा समावेश होता. त्यावेळी ब्रिटनने भारताला आश्वासन दिलं होतं की, दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य दिलं जाईल. 

...आणि ब्रिटिश इंडियाचे झाले दोन तुकडे! 

स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. कारण त्यांना ते स्वप्न पूर्ण होण्याची आशा होती, जे त्यांनी स्वतंत्र भारतासाठी पाहिलं होतं. पण याच दरम्यान, भारतात मुस्लिमांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत एका गटाने थेट स्वतंत्र देशाचीच मागणी केली आणि या गटाचं नेतृत्व करत होते मोहम्मद अली जिन्ना. फाळणीची मागणी होताच देशातील अनेक भागामध्ये जातीय दंगली भडकल्या होत्या. जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांच्या स्वप्नांवर एक प्रकारे मोठा आघात होता. याच परिस्थिती दरम्यान, ब्रिटिश इंडियाचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारत आणि पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश करण्याचा निर्णय घेतला. 

अनेक इतिहासतज्ज्ञांचं मत आहे की, माउंटबॅटन यांनी हा निर्णय फारच घाईघाईत घेतला होता. मुस्लिमांसाठी वेगळ्या देशाच्या मागणीवरुन होणारा हिंसाचार इतका भडकला होता की, ज्यामुळे याविषयी एक सर्वमान्य कराराची चाचपणीच झाली नाही की, जो करार काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांना मान्य होईल. जिन्ना यांच्या हट्टापुढे त्यावेळी भारतातील जवळपास सर्वच नेत्यांनी गुडघे टेकले होते. फक्त एकटे गांधीजीच असे नेते होते की, जे यासाठी तयार नव्हते. असंही म्हटलं जातं की, तेव्हा गांधी असं म्हणाले होते की, ते जिवंत असेपर्यंत देशाचे दोन तुकडे होणार नाही. पण स्वतंत्र देशाच्या मागणीला बऱ्याच भारतीय नेत्यांनी दिलेल्या होकारामुळे माउंटबॅटन यांचं काम सोपं झालं होतं.

स्वातंत्र्याच्या आश्वासनामध्ये होती फाळणीची आग 

मुसलमानांसाठी वेगळ्या देशाच्या मागणी हा निर्णय धार्मिक आधारावर घेण्यात आला होता. पण यावेळी सगळ्यात मोठी समस्या ही होती की, जमिनीचा जो तुकडा भारत बनविण्याचा निर्णय घेतला तिथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या होती. तर जिथे पाकिस्तान बनविण्याचा निर्णय घेण्यात आला होता तिथेही मोठ्या प्रमाणात मुस्लिमांसोबत हिंदू आणि शिख राहत होते. भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा निश्चित करण्याचं काम सर सिरील रेडक्लिफ यांच्यावर सोपवण्यात आली होती. ज्यांनी तत्कालीन ब्रिटिश इंडियाचे दोन प्रमुख प्रांत पंजाब आणि बंगालमधील जिल्ह्यांमध्ये बहुसंख्य लोकसंख्येच्या आधारावर सीमारेषा निश्चित केली.  

१९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा येथील लोकसंख्या ही ४० कोटी एवढी होती. ज्यामध्ये त्या भागाचाही समावेश आहे जो आज पाकिस्तान आणि बांगलादेशच्या स्वरुपात दोन वेगवेगळ्या देशांच्या रुपाने अस्तित्वात आहे. जेव्हा देशातील लोक हे ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळेल याबाबत आश्वस्त होते त्याचवेळी फाळणीच्या एका ठिणगीने देशात वणव्याचं रुप धारण केलं आणि ज्यामध्ये लाखो लोकांचे जीव गेले. यावेळी कोट्यवधी लोकांना आपलं सारं काही सोडून भारतात यावं लागलं. 

'प्रत्येक ठिकाणी होतं दंगल आणि हिंसाचाराचं वातावरण' 

असं म्हटलं जातं की, जेव्हा यावेळी दोन्हीकडे दंगल भडकली तेव्हा तब्बल १० लाखांहून अधिक लोकांचे प्राण गेले. दरम्यान, काही रिपोर्ट्समद्ये हा आकडा २० लाख देखील सांगण्यात आला आहे. फाळणीने कोणालाही सोडलं नाही. महिला, मुलं, वृद्ध सगळ्यांना या हिंसेत आपले प्राण गमवावे लागले. या हिसेंमुळे जिथे लाखो लोकांचे प्राण गेले तसंच याच दरम्यान, तर काही जण बेपत्ताही झाले. लाखोंच्या संख्येने लोकं बेघर झाले. प्रत्येक ठिकाणी दंगल, हिंसा आणि हत्या हेच वातावरण पाहायला मिळत होतं. 

याच दरम्यान, पाकिस्तानमधील हिंदू आणि शिख हे मोठ्या संख्येने भारतात आले. तर भारतातून मोठ्या प्रमाणात मुसलमान हे पाकिस्तानात गेले. दोन्ही बाजूकडील ज्या लोकांनी पलायन केलं त्यांची संख्या ही जवळजवळ १.५ कोटी असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये त्या लोकांचाही समावेश आहे जे पायीच या देशातून त्या देशात गेले होते. यावेळी दोन्हीकडील लोकांना घेऊन येण्यासाठी आणि नेऊन सोडण्यासाठी रिफ्यूजी स्पेशल ट्रेन या उत्तर आणि पश्चिम लाइनवर चालवण्यात येत होत्या. यादरम्यान हिंसा, लूटमार अशा घटना सुरुच होत्या. या सगळ्या प्रकारामुळे मानवतेला मात्रा काळीमा फासला जात होता. आपल्या पूर्वजांनी जे स्वतंत्र भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्याला मात्र फाळणीची अतिशय बोचरी किनार होती. 

ब्रिटिश इंडियाची फाळणीची इतिहासातील सर्वात मोठी मानवी शोकांतिका म्हणून नोंद आहे. आजही लोकं त्या गोष्टीच्या आठवणीनं थरारून जातात. पण आता असे फार कमी लोकं राहिले आहेत की, जे त्यावेळेस भारतातून पाकिस्तान आणि पाकिस्तातून भारतात आले होते. पण जे आजही जिवंत आहेत त्यांच्यासाठी हे एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा काही कमी नव्हतं. फाळणीची ती जखम आजही त्यांच्यासाठी ताजीच आहे. यामध्ये बहुतांश ते लोकं आहे ज्याचं वय तेव्हा १० ते २० होतं. त्यांचं वय आज ८० ते ९० वर्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
अशी आहे भारत-पाकिस्तान फाळणीची गोष्ट, जिन्नाचा हट्ट आणि इंग्लंडच्या धूर्तपणाने झालेली वाताहात! Description: India-Pakistan Partition Story: भारत आणि पाकिस्तानमध्ये आज स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला जात असला पण स्वातंत्र्यासोबतच फाळणीच्या कधीही न विसरता येणाऱ्या कठू आठवणी आज देखील तितक्याच ताज्या आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...